तरुणांच्या शिस्तीचा सिग्नल!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 24 April 2019

डॉ.   फ्रिटझ रेडल यांनी शिस्तीची तुलना वाहतुकीच्या सिग्नलशी केली आहे. ती मोठी मजेशीर आणि उद्‌बोधक आहे. शिस्तीच्या सिग्नलचे तीन दिवे असे असतात.

हिरवा दिवा - हे वागणं स्वीकारार्ह, स्वागतार्ह... इथं होकार, मुभा, मोकळीक.
पिवळा - काही प्रासंगिक कारणात थोडी सूट.... ठीक आहे, आतापुरतं चालेल अशी.
लाल दिवा - कुठल्याही परिस्थितीत अशा वागण्याला मुभा नाही. हिरव्या दिव्याच्या वेळी जितकी मोकळीक असावी, तितकीच लाल दिव्याच्या वेळी कडक शिस्त असावी. 

डॉ. रेडल यांचं यासंदर्भात एक महत्त्वाचं निरीक्षण आहे. ते म्हणतात, ‘‘आई-बाबा आपल्याला वाटेल तसं वागू देत नाहीत म्हणून मुलं कायम त्यांच्यावर चिडलेली असतात, हा समज चुकीचा आहे. उलट आपलं काही चुकल्यास आई-बाबांचं लक्ष आहे, तसं ते आपल्याला सांगतीलच, आपलं वागणं सुधारतीलच, ही जाणीव मुलांना काहीसा दिलासा देते, आश्‍वस्त करते. ती अधिक मोकळी होतात, बोलतात आणि योग्यवेळी आई-बाबांचं ऐकतातही. शक्‍य तिथं त्यांना पूर्ण मोकळीक द्यायला हवी. मुलांना स्वातंत्र्य हवं असतं म्हणजे वाटेल तसं, बेशिस्त बेदरकार वागायचं असतं, असं नाही. मर्यादा आणि मुभा यांचा योग्य समन्वय मात्र साधायला हवा. जगभरातले वाहनचालक वाहतुकीच्या दिव्यांचं पालन का करतात? केवळ दंडाच्या भीतीनं नव्हे, तर ही बंधनं पाळल्यामुळंच अपघात होणार नाहीत, आपण सुरक्षित राहू, याची त्यांना मनोमन खात्री पटलेली असते. लाल दिव्याच्या वेळी मुकाट्यानं थांबताना त्यांना फारसं जड जात नाही. कारण, हिरवा दिला लागताच आपल्याला कुणी अडवणार नाही, याची त्यांना पूर्ण खात्री असते.

मुलांसाठी मर्यादा आखताना पालकांनी हा सर्व विचार करायचा असतो. काय चालतं आणि काय चालणार नाही, दोन्हींबाबत स्पष्टता असावी लागते. बहिणीला बोचकारलं तर चालेल का? अजिबात नाही. इथं नाही म्हणजे नाहीच. तिच्या अंगावर चिखलाचं पाणी उडवलं तर चालेल का? अजिबात नाही. तिला चिडवलं तर चालेल का? चालेल, पण सारखं सारखं नाही. बशी फेकली तर चालेल का? अजिबात नाही. उशी फेकली तर चालेल का? एकवेळ चालेल. नदीच्या पाण्यात खडे फेकले तर... खुशाल... हवे तेवढे!

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News