तरुणाईला वेड लागले ‘मॉडेल शुट’ चे
कोकणात मॉडेल शुटचा प्रकार चांगलाच फोफावत आहे. येथील हिरवीगार निसर्गसंपन्नता, अथांग समुद्र यांच्या सानिध्यात केलेली मॉडेल फोटोग्राफी सहज लक्ष वेधून घेते
अलिबाग : सणावारीला नवीन कपडे घालून नटणं, मुरडणं हा तरुणाईचा स्थायीभाव. वेगळ्या पद्धतीने साजरे केलेले सण आठवणीत रहावे यासाठी आजची तरुणाई मॉडेल शुटच्या प्रेमात पडत चालली आहे. दिवाळीमध्ये पणती लावताला युवती, हातात फुलबाजे उडविताना मुले, होळीच्या सणात रंगात बेधुंद झालेले तरुण ही ‘मॉडेल शुट’चे प्रकार लोकप्रिय होत चालले आहेत.
कोकणात मॉडेल शुटचा प्रकार चांगलाच फोफावत आहे. येथील हिरवीगार निसर्गसंपन्नता, अथांग समुद्र यांच्या सानिध्यात केलेली मॉडेल फोटोग्राफी सहज लक्ष वेधून घेते. होळीची धुळवड असो, नारळीपौर्णिमेनिमित्ताने पारंपारिक वेशभूषेतील कोळी महिला, पंढरीचे वारकरी, गणपती विसर्जन, भाऊबिज, रक्षबंधन असे एक ना अनेक सणाची रेलचेल येथे सुरू असते. पारंपारिक फोटोग्राफीमधील या बदलत्या ट्रेंडला चांगली व्यावसायिकता मिळत आहे. प्रत्येक ऋतूचे प्रतिबिंब या सणामध्ये दिसून येते हे प्रत्यक्षात छायाचित्रात उतरविण्याचे कसब मात्र फोटोग्राफर्सचे असते. मनाप्रमाणे फोटो क्लिक होईपर्यंत त्यांची फोटोग्राफी सुरूच असते. कोकणातील तरुणांचे हे आवडते वेड लक्षात घेवून येथील फोटोग्राफर्सनी ‘मॉडेल फोटोग्राफी’ व्यावसायिक पद्धतीने करण्यास सुरूवात केली आहे. येथील तरुणांची आवड पारंपारिक सणांपर्यंत मर्यादीत राहिलेली नाही तर त्यापुढे जावून चिखलातील नांगरणी, रोपांची लावणी, कापणी, मळणी अशी माध्यमं मॉडेल शुटसाठी वापरली जातात. स्टुडियोमध्ये मेकअप करुन काढलेल्या फोटोंपेक्षा निसर्गाच्या सानिध्यात काढलेल्या फोटोमध्ये नैसर्गिकता अधिक दिसते. प्रत्यक्ष फोटोग्राफीनंतर फोटोशॉपमध्ये वेगवेगळ्या इफेक्टचा वापर करुन ते फोटो अधिक आकर्षक केले जाते. चित्रपटातील नायकांचेही अनुकरण करण्याचेही यातून दिसून येतात.