अमली पदार्थांमुळे तरुणाई व्यसनाच्या आहारी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 February 2020

अमली पदार्थविरोधी कक्षातर्फे करण्यात येत असल्येल्या कारवाईत वाढ होत असली, तरी अटक करण्यात आलेल्या आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. चार वर्षांत दाखल करण्यात आलेल्या ११६ गुन्ह्यांत अटक करण्यात आलेल्या १८५ आरोपींपैकी फक्त एका आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली असून, ३९ आरोपींना न्यायालयीन कोठडी; तर १४५ आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
अमली पदार्थविरोधात होणाऱ्या कारवाईत वाढ होत असून, सातत्याने कारवाई चालत राहणार आहे. यासाठी पोलिसांना सामान्य नागरिकांचीही मदत लागणार आहे.

- रवींद्र बुधवंत,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अमली पदार्थ विरोधी पथक

पनवेल : स्मार्ट सिटी म्हणून उदयास  येणाऱ्या पनवेल शहरातील तरुणाई अमली पदार्थाच्या विळख्यात सापडली असून पोलिसांची वेळोवेळी कारवाई होत असली, तरी हे अमली पदार्थ नशेखोरांना सहज उपलब्ध होत आहेत. त्यामुळे तरुणांवर चढलेली अमली पदार्थांची नशा उतरवण्याची गरज आहे.

२०१६ मध्ये अमली पदार्थविरोधी कक्ष स्थापन करण्यात आला. या कक्षामार्फत मागील चार वर्षात करण्यात आलेल्या कारवाईत ११६ गुन्ह्यांत १०० तक्रारी दाखल करून १८५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच वर्षभरात पथकाकडून २० कोटींचा माल जप्त करण्यात आला असून ८१ आरोपींना अटक करण्यात आली.

नवी मुंबई, पनवेल परिसरात वाढत्या लोकसंख्येनुसार अमली पदार्थांच्या आहारी जाणाऱ्यांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या शहरात अमली पदार्थ सेवन करणारे दोन वर्ग आहेत. त्यापैकी एक वर्ग झोपडपट्टीत राहणारा; तर दुसरा शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा आहे.

झोपडपट्टी भागात राहणारे गांजा, चरस यांसारख्या स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारे अमली पदार्थ सेवन करतात; तर याउलट श्रीमंत, अतिउच्च समाजातून आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा कल महागड्या अमली पदार्थांकडे असल्याने, अमली पदार्थ विक्री करणारे तस्कर दोघांच्या गरजा भागवण्यासाठी तेवढेच सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे.  

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News