वाढत्या बेरोजगारीमुळे युवक व्यसनाच्या आहारी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 4 March 2020

सध्याच्या आधुनिक युगामध्ये एका हातामध्ये स्मॉर्ट फोन असल्याने युवक बेरोजगार जरी दिसत नसला तरी त्यांच्या आर्थिक उत्पन्नाचे कोणतेही साधन मात्र, दूरवर दिसून येत नाही.

अर्जुनी-मोरगाव : ग्रामीण भागात वाढत्या बेरोजगारीमुळे उच्चशिक्षित युवक बेजार झाले आहेत. ग्रामीण भागात व्यवसायाला कोणताही प्रतिसाद मिळत नाही. तसेच व्यवसाय करण्यासाठी पैशाची चणचण आणि बॅंकांकडून कर्ज पुरवठा करण्यास दिरंगाई होत असल्याने युवकांपुढे बेरोजगारीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शासनाने नोकरी भरती आणि व्यवसाय वाढीस प्रोत्साहन देण्याची मागणीही युवकांनी केली आहे. 

सध्याच्या आधुनिक युगामध्ये एका हातामध्ये स्मॉर्ट फोन असल्याने युवक बेरोजगार जरी दिसत नसला तरी त्यांच्या आर्थिक उत्पन्नाचे कोणतेही साधन मात्र, दूरवर दिसून येत नाही. शासनही बेरोजगारी दूर करण्यासाठी कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही. उच्चशिक्षित असंख्य युवकांच्या हाताला काम देण्यास शासन अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक युवकांचे मानसिक संतुलन ढासळले असून ते व्यसनाच्या आहारी जात असल्याचे चित्र शहरासह ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. काही उच्चशिक्षित अवैध मार्गाचा वापर करून पोटाची खळगी भरण्याचे काम करीत असल्याचे चित्र दिसत आहे.

शहरात सुशिक्षित बेरोजगार युवकांना कुटुंबाचा गाडा चालविणाऱ्या आपल्या आई-वडिलांना मदत करण्यासाठी काम करण्याची भरपूर इच्छा असते. पण आजच्या ऑनलाईन व्यवसायाने अनेक व्यवसाय ठप्प पडत आहेत. तर दुसरीकडे या व्यवहारामुळे स्थानिक रोजगार हिरावला जात आहेत. त्यामुळे आर्थिक उत्पन्नाचे मार्ग हळू-हळू बंद होत आहेत. या गंभीर बाबीकडे अजून पर्यंत शासनाचे लक्ष गेलेले दिसून येत नाही. याउलट परिस्थिती म्हणजे ऑनलाईन व कॅशलेस व्यवहार करण्यासाठी शासन गंभीर असून असे व्यवहार करण्यासाठी सक्‍ती आणत आहे. या प्रकारामुळे तरुण वर्ग आकर्षिला जात आहे. गेल्या जवळपास सात-आठ वर्षाच्या कालावधीत शासकीयस्तरावर नोकर भरती ठप्प आहे. अनेक शिक्षक खाजगी शाळांवर तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. शासन एखादी मोठी पदभरती करेल आणि आपण शासकीय सेवेत लागू, अशी अपेक्षा बाळगून असणारे असंख्य युवक-युवतींचा हिरमोड होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.

वाढत्या बेरोजगारीमुळे कोणत्याही मोर्चामध्ये धरणे आंदोलनामध्ये विविध पक्षांच्या पक्षबांधणीमध्ये युवक वाटल्या जाऊन व्यसनांच्या आहारी सुद्धा जात असल्याचे चित्र दिसत आहे. या प्रकारांमुळे शहरासह ग्रामीण भागातील चौकाचौकात सुशिक्षित बेरोजगार तरुणांची घोडके निर्माण होऊन गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे. अल्पशिक्षित बरोबरच सुशिक्षित तरुणांना शैक्षणिक पात्रतेप्रमाणे कामच उपलब्ध नसल्याने करावे तरी काय असा प्रश्न निर्माण होत आहे. या बाबीकडे युवकांच्या आई-वडिलांसह शासन प्रशासनाने लक्ष केंद्रीत करून नवा भारत देश घडविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणे काळाची गरज झाली आहे.

बॅंकांची टाळाटाळ

सुशिक्षित युवकांना रोजगारासाठी कर्ज देण्यासाठी सरकार विविध योजना सुरू केल्या आहेत. परंतु, बॅंकांकडून टाळाटाळ होत असल्याने त्यांचे व्यवसाय करण्याचे स्वप्न भंगले आहे. शासनाने कर्ज देण्यासाठी संदर्भात कठोर पावले उचलावी, अशी मागणी होत आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News