नागपूरच्या तरूणीने घेतली या क्षेत्रात उंच भरारी

केवल जीवनतारे
Friday, 7 February 2020
  • माझं कुटुंब अवघं दोन जणांचं. आई आणि मी. मी मुंबईत. आई नागपुरात. या नव्या जमान्यात टिकायचं असेल तर बोलण्यापेक्षा कृती महत्त्‍वाची आहे. म्हणूनच आईच्या आशीर्वादाने दोघी दूर आहोत, परंतु आमची नाळ जुळली आहे. माझ्या यशात आईचा आणि आईचाच मोलाचा वाटा आहे. 
  • लहानपणी रुचिराचे वडिल गेले. आधार गेल्यानंतर संघर्षाचे दिवस बघितले आहेत. म्हणूनच अगदी मनापासून तिने निवडलेल्या क्षेत्रात तिला साथ दिली. मुंबईच्या चित्रसृष्टीत मिळालेल्या संधीचे तिने सोने केले. काल जे स्मित रुचिराच्या चेहऱ्यावर होते उद्याही तिच्या चेहऱ्यावर दिसत राहावे, हीच इच्छा

नागपूर : स्वप्नं प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ती नागपुरातून मुंबईच्या चित्रनगरीत पोहोचली. मुंबईच्या झगमगाटात साडेसहा वर्षे संघर्ष केला. जिद्द, मेहनत आणि प्रयत्नांच्या जोरावर ती आज मुंबईच्या हिंदी चित्रपटसृष्टीत स्थिरावली आहे. आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून तिने ‘बोले चुडिया’ या नवाजुद्दीन सिद्धीकी यांच्यासोबत अभिनय करण्याच्या संधीचे सोने केले, तर नागपूरची ही पोरगी ‘वाजवूया बॅंड बाजा’ या मराठी चित्रपटातून रसिकांच्या भेटीला लवकरच येत आहे. या गुणी अभिनेत्रीचे नाव आहे रुचिरा घोरमोरे.  

नागपुरातील झिंगाबाई टाकळी परिसरात आई तनुजा वाटकर-घोरमारे यांची एकुलती एक मुलगी. दोघीच मायलेकी एकमेकासाठी जगत आहेत. सेंट फ्रॉन्सिमधून बारावीनंतर रायसोनी इंजिनिअर कॉलेजमध्ये रुचिरा इंजिनिअरिंगचे धडे घेत होती. तीन वर्षे इंजिनिअरिंग केल्यानंतर अचानक आवडीच्या अभिनयाच्या क्षेत्रात तीने उडी घेतली. नागपुरातून मुंबईला पोहचली. मुंबईच्या चित्रनगरीचा अभ्यास केला. अनेक दिग्गज कास्टिंग दिग्दर्शकांच्या फेसबुकवर मॅसेज टाकून भेटण्यासाठी वेळ मागितली. विनंती करीत होती. हळुहृळु प्रतिसाद मिळू लागला. झाकिर हुसेन यांच्यासोबत हिंदी रंगभूमीवर काम करताना एक एक पाऊल पुढे टाकत होती. 

रुचिराने ‘पाणी पंचायत’ या गाजलेल्या शॉर्ट फिल्म मध्ये मुख्य भूमिका साकारली. यातून रसिकांचे मन जिंकले. नवाजुद्दीन सिद्धीकी यांच्या ‘बोले चुडिया’ या हिंदी चित्रपटात अभियनाची संधी मिळण्यापुर्वी अभिनयाच्या जोरावर रुचिराला ‘वाजवूया बॅंड बाजा’ या मराठी चित्रपटात अभिनेता मंगेश देसाई यांच्यासह मुख्य भूमिका करण्याची संधी मिळाली. 

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार, दिग्दर्शक राष्ट्रीय पुरस्कार विजेते लक्ष्मण एकनाथराव कागणे, अमोल कागणे निर्मित आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवाजी लोटन पाटील यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. यातूनच शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित ‘वाजवूया बॅंड बाजा’ लवकरच प्रदर्शीत होत आहे. याशिवाय सिनेदिग्दर्शक अनुराग कश्‍यप यांच्या ‘मुक्काबाज’ या चित्रपटातही रुचिराने भूमिका केली आहे. याशिवाय या चित्रपटात सहायक दिग्दर्शक म्हणून तीने काम बघितले. 

वडिलांचं छत्र हरवलं तरीही...
मुलांच्या शिक्षणासाठी खस्ता खाणारे आईवडील समाजात पदोपदी पाहायला मिळतात. परंतु २००६ मध्ये रुचिराच्या डोक्‍यावरून वडिलांचे छत्र हरवले आणि आई तनुजा यांनी आई आणि वडिलांची अशा दोन्ही भूमिका निभावल्या. लेकीनी या क्षेत्रात उंच भरारी घ्यावी यासाठी झळा सोसल्या. रुचिराच्या यशासंदर्भात विचारणा केली असता, आईचे डोळे पाणावले. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News