युवकांनी शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 2 March 2020

शिवाजी महाराज यांनी कधीही तिथी,मुहूर्त,वार बघून लढाया केल्या नाहीत. याउलट अमावास्येच्या रात्रीच त्यांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या. शिवाजी महाराज हे  बहुजन समाजाचे  राजे होते. त्यांनी अठरापगड जाती धर्मातील लोकांना एकत्रित करून स्वराज्याची निर्मिती केली. शिवाजी महाराजांचा आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे

तळोदा :  शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन नाचण्याची पेक्षा आजच्या तरुण पिढीने त्यांना डोक्यात घेतले, तर शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील स्वराज्य खऱ्या अर्थाने अस्तित्वात येईल, असा संदेश सत्यपाल महाराज 
यांनी दिला.

तळोदा येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या शिवस्वराज्य निर्धार मेळाव्यात सप्तखंजेरीवादक,राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम काल झाला. त्यावेळी ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील होते. मेळाव्याचे उद्घाटन  अमरजित बारगळ यांच्या हस्ते करण्यात आले.  प्रमुख पाहुणे म्हणून देवमोगरा विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चेतन पवार,जिल्हा मजूर फेडरेशनचे सुरेश इंद्रजित, माळी समाज अध्यक्ष अरविंद मगरे, प्राचार्य अजित टवाळे आदी उपस्थित होते.

कीर्तनात सत्यपाल महाराज यांनी शिवाजी महाराजांचे अनेक उदाहरणे देत सोप्या भाषेत पटवून सांगितले.ते म्हणाले की, शिवाजी महाराज यांनी कधीही तिथी,मुहूर्त,वार बघून लढाया केल्या नाहीत. याउलट अमावास्येच्या रात्रीच त्यांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या. शिवाजी महाराज हे  बहुजन समाजाचे  राजे होते. त्यांनी अठरापगड जाती धर्मातील लोकांना एकत्रित करून स्वराज्याची निर्मिती केली. शिवाजी महाराजांचा आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे. शिवाजी महाराजांनी कोणत्याही जातिधर्माच्या द्वेष केला नाही,परंतु काही मंडळी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना बळी पडू नका.

आपल्या कीर्तनातून सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांनी कालबाह्य रूढी, परंपरा, कर्मकांड, व्यसनाधीनता,  मोबाईलचा अतिवापर, याबाबींवर जोरदार टीका केली.बहुजन समाजाने अंधश्रद्धामुक्त व्हावे. युवकांनी शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक स्त्रीचा आदर केला पाहिजे. सर्व प्रकारच्या व्यसनापासून दूर राहिले पाहिजे,असे आवाहन केले.

अविनाश पाटील म्हणाले की, कीर्तन हे संत परंपरेतले प्रबोधनाचे महत्त्वाचे माध्यम आहे.परंतु काही कीर्तनकारांनी त्याचे व्यवसायीकरण केले आहे. लोकप्रियता मिळविण्याच्या प्रयत्नात त्याचे स्वरूप बदलून टाकले आहे. कीर्तनातून समाजामध्ये प्रबोधन झाले पाहिजे. काही लोक कीर्तनाचा वापर समाजात अंधश्रद्धा व वैज्ञानिक बाबी पसरविण्यासाठी करतात. हे चुकीचे असून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा अशा बाबींना कायदेशीररीत्या विरोध कायम राहील,असे ते म्हणाले.

शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.  डॉ. डी. बी. शेंडे यांनी प्रास्ताविक केले.मुकेश कापूरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा सुनील पिंपळे यांनी आभार मानले.  प्रा. प्रशांत बोबडे, हंसराज महाले, एन के माळी, अमोल पाटोळे, अनिल निकम, प्रा रविकांत आगळे, संदीप मुके, प्रणीत धारगावे, विकास सुसर, संकेत माळी, स्वप्निल महाजन, संतोष माळी आदींनी संयोजन केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News