तरूणांनो नोकरीपेक्षा आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 February 2020

जीवनात यशस्वी होण्यासाठी तंत्रज्ञान आणि आर्थिक विषयांची जाण असली पाहिजे.

कोथरूड : ‘‘आपण निवडलेल्या करिअरच्या क्षेत्रात सर्वोत्तम आणि प्रतिभाशाली बनणे, हीदेखील देशसेवा आहे. जी गोष्ट करताना आपल्याला कष्ट न वाटता आनंद वाटतो, तीच गोष्ट करणे आवश्‍यक असते आणि आपल्याला काय येते, हे ओळखूनच त्याच्या पायावर जीवनाची इमारत उभी केली पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाला ‘स्व’ची ओळख झाली पाहिजे, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरकमहोत्सवी वर्षानिमित्ताने गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या व्याख्यानात ‘व्यक्तिमत्त्व आणि करिअर यातून देशसेवा’ या विषयावर धर्माधिकारी बोलत होते.महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे या वेळी उपस्थित होते.

धर्माधिकारी म्हणाले की, समृद्ध, आनंदी, तेजस्वी व्यक्तिमत्त्वाच्या आधारे करिअर घडविणे म्हणजेच देशसेवा. स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्याचे उत्तुंग उदाहरण आहे. त्यांनी मातृभूमीच्या सेवेसाठी आपल्या अंगभूत गुणांचा विकास केला. आपल्या ज्ञानाचा उपयोग मायभूमीच्या उद्धारासाठी होणार नसेल ती विद्या केवळ भार आहे, अशी त्यांची भावना होती.

जीवनात यशस्वी होण्यासाठी तंत्रज्ञान आणि आर्थिक विषयांची जाण असली पाहिजे. तरुणांनी नोकरी मिळविण्यापेक्षा आपल्या आवडीच्या क्षेत्रातील उद्योजक होण्याची गरज आहे. कारण, देशात रोजगार आणि संपत्तीनिर्मिती होण्याची अतिशय आवश्‍यकता आहे. आपण ज्या क्षेत्रात काम करीत आहोत, त्यात जागतिक दर्जा गाठता आला पाहिजे, असेही ते म्हणाले.डॉ. आनंद लेले यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News