सर्वत्र लग्नसराईची धामधूम , व्यावसायिकांसाठी अच्छे दिन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 4 March 2020

ग्रामीण भागात रविवारी व सुट्यांच्या दिवशी शाळा व समाजमंदिरांमध्ये लग्न होत आहेत. ​

सोयगाव : कसमादे भागात विवाहांची धामधूम सुरू आहे. लग्नतिथी दाट असल्याने शहरातील मंगल कार्यालये हाउसफुल झाली आहेत. वधूपित्यांची लग्नाच्या नियोजनासाठी लगबग सुरू आहे. वधूपित्यांची लॉन्स, मंगल कार्यालयांना पसंती मिळत आहे.

मालेगाव शहराजवळील सर्व सोयींयुक्त ऐश्‍वर्या मंगल कार्यालय, लॉन्स, चिंतामणी लॉन्स, भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय, प्रथम लॉन्स, मोरया, अमेय लॉन्स, हरिकेश लॉन्स, कृष्णा लॉन्स, सहयोग मंगल कार्यालय, बालाजी लॉन्स, मातोश्री लॉन्स, जय माता दी, गंगामाय मंगल कार्यालय दोन ते तीन महिने आधीच उन्हाळ्यातील लग्नतिथींसाठी बुक झाले आहेत. ब्राह्मण, परदेशी, शिंपी व सुवर्णकार यांसह विविध समाजाची मंगल कार्यालये आहेत. विवाहाबरोबरच इतर कार्यांसाठी मंगल कार्यालयांना प्राध्यान्य देण्यात येते.

सर्व मंगल कार्यालये फुल झाल्याने हॉटेलमध्येही लग्नकार्य होत आहेत. यासाठी मराठा दरबार हॉल, हॉटेल सविता यांसह काही हॉटेल्स आहेत. ग्रामीण भागात रविवारी व सुट्यांच्या दिवशी शाळा व समाजमंदिरांमध्ये लग्न होत आहेत. काही ठिकाणी मंदिरांतही लग्न लावली जात आहेत. मारुती मंदिर किंवा घरासमोर मोकळ्या जागेत रात्री लग्नांना वधूपिता प्राधान्य देत आहेत. मुस्लिम बांधवांमध्ये प्रामुख्याने मशिदीत विवाह (निकाह) पार पडतात. विवाहानंतर छोटेखानी भोजन सोहळा वधूच्या घरासमोरच उरकला जातो. बिर्याणी व अन्य एक गोड पदार्थ करून लग्न आटोपले जाते.

व्यावसायिकांना अच्छे दिन

लोकसंख्येमुळे अजून मंगल कार्यालयांची शहरात आवश्‍यकता भासत आहे. दाट तिथीमुळे वाजंत्री, केटरर्स, पिण्याच्या पाण्याचे पुरवठादार, रोषणाईवाले, चाट व्यावसायिक, पान विक्रेत्यांसह मंडप डेकोरेटर्स, घोडेवाले आदी व्यावसायिकांना अच्छे दिन आले आहेत.

पार्किंगची समस्या

सटाणा रोडवरील लॉन्सला वधूपित्यांची पहिली पसंती ठरत आहेत. यंदा दाट लग्नतिथी असल्याने दोन ते तीन महिने अगोदरच अनेक वधूपित्यांनी मंगल कार्यालयांची आगाऊ नोंद केली आहे. मंगल कार्यालय व लॉन्समध्ये लग्न होत असले तरी प्रत्येक ठिकाणी पार्किंगची समस्या आहे. दोन ते तीन लॉन्स वगळता पार्किंगची सुविधा नाही.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News