खराब फॅार्ममुळे विराटने गमावले अव्वल स्थान

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 February 2020

फलंदाजीच्या पहिल्या दहा खेळाडूंत अजिंक्‍य रहाणे, चेतेश्‍वर पुजारा आणि मयांक अगरवाल अनुक्रमे आठ, नऊ आणि दहाव्या स्थानी आहेत

दुबई : न्यूझीलंडविरुद्धचा पहिल्या कसोटी सामन्यात अवघ्या २१ धावाच करू शकलेला भारतीय कर्णधार विराट कोहलीला घसरलेल्या या फॉर्मचा दुहेरी फटका बसला आहे. कसोटी क्रिकेमधील फलंदाजीचे अव्वल स्थान त्याला गमवावे लागले आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव स्मिथ पुन्हा एकदा अव्वल स्थानी विराजमान झाला आहे.

कोहलीचे ९०६ गुण झाले आहे; तर अव्वल स्थानी आलेल्या स्टीव स्मिथच्या खात्यात ९११ गुण जमा झाले आहेत. फलंदाजीच्या पहिल्या दहा खेळाडूंत अजिंक्‍य रहाणे, चेतेश्‍वर पुजारा आणि मयांक अगरवाल अनुक्रमे आठ, नऊ आणि दहाव्या स्थानी आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या या कसोटीत फटकावलेल्या ७५ धावांचा फायदा रहाणेला झाला. त्यामुळे त्याच्या क्रमवारीत एका गुणाने प्रगती झाली. मयांक अगरवाल प्रथम अव्वल दहा खेळाडूत स्थान मिळवू शकला आहे. विराटप्रमाणे या कसोटीत अवघ्या ११ धावा करणाऱ्या पुजाराची दोन क्रमांकानी घसरण झाली आहे.

जून २०१५ मध्ये स्मिथ प्रथमच कसोटीतील फलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थानी आला होता. त्यानंतर विराट कोहलीबरोबर त्याची प्रमुख स्पर्धा होत होती. २०१५ नंतर तो आता आठव्यांदा पुन्हा पहिल्या क्रमांकावर आला आहे. स्मिथ-कोहली यांच्या शर्यतीत डिसेंबर २०१५ मध्ये आठ दिवसांसाठी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन अव्वल स्थानावर होता. विल्यमसन आता तिसऱ्या क्रमांकावर आहे.

अश्विनचीही घसरण

न्यूझीलंडविरुद्धच्या या पहिल्या कसोटीत ९९ धावांत तीन विकेट मिळवणारा आर. अश्‍विन गोलंदाजीच्या क्रमवारीत नवव्या स्थानी घसरला आहे. मात्र टॉप टेनमध्ये तो एकमेव भारतीय आहे. या कसोटीत पाच विकेटची कामगिरी करणाऱ्या ईशांत शर्माने १७ व्या स्थानापर्यंत प्रगती केली आहे. कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेत भारताचे ३६० गुण झाले आहेत आणि पहिला क्रमांक कायम राहिला आहे. दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचे २९६ गुण झाले आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News