रांगड्या सह्याद्रीच्या कातळशिल्पावर असलेल्या तेलबेलच्या जुळ्या भिंती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 8 March 2020

पुण्यापासून किंवा मुंबईहून लोणावळामार्गे अंदाजे शंभर सव्वाशे किलोमीटर अंतरावर हे नैसर्गिक कातळशिल्प आहे. लोणावळा-सहारा सिटी-सालतर-तेलबेल या मार्गाने या गावात पोचता येते.

पुण्याच्या आणि मुंबईच्या आसपास शेजार लाभला आहे रौद्र रांगड्या सह्याद्रीचा. सुवर्णहारात रत्ने जडवावीत तशी सह्याद्रीत गडकिल्ले, शिखरे, पाषाणशिल्पे जडवलेली आहेत. त्यातलेच एक म्हणजे तेलबेल किंवा तेलबैलाच्या जुळ्या भिंती.

पुण्यापासून किंवा मुंबईहून लोणावळामार्गे अंदाजे शंभर सव्वाशे किलोमीटर अंतरावर हे नैसर्गिक कातळशिल्प आहे. लोणावळा-सहारा सिटी-सालतर-तेलबेल या मार्गाने या गावात पोचता येते. गावापासून साधारण वीस मिनिटांच्या अंतरावर तेलबेलच्या जुळ्या भिंती ठळकपणे नजरेत भरतात.

सह्याद्रीची रचनाच मुळात हजारो वर्षांपूर्वी ज्वालामुखीतून निघालेल्या लाव्हारसापासून झाली आहे. एकावर एक लाव्हाचे थर जमा होऊन थंड होऊन आणि हजारो वर्षे त्यांची झीज होऊन काही वैशिष्ट्यपूर्ण अश्मरचना तयार झाल्या आहेत. त्याला डाईकची अश्मरचना म्हणतात. तेलबेलच्या जुळ्या भिंती ही त्यातलीच एक. तेलबेलाच्या जुळ्या भिंतीच्या मध्ये एक खिंड आहे. गावातून एक पायवाट त्या माचीपर्यंत घेऊन जाते आणि पुढे त्या खिंडीत. खिंडीत त्या जुळ्या भिंतींपैकी एकीच्या पोटात एक गुहा खोदलेली आहे. स्थानिक गावकऱ्यांचे तिथे देवस्थान आहे. बारमाही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. दुसऱ्या भिंतीच्या पोटात दोन गुहा आणि एक टाके खोदलेले आढळते.

खिंडीच्या वर भिंतीवर आरोहणासाठी प्रस्तररोहणाची सामग्री आणि कौशल्य आवश्यक आहे. खिंडीपर्यंत येऊन तिथलं अश्मवैभव पाहण्याकरिता एखाद्या दिवसाची सहल नक्की होऊ शकते. गावातच चहा-नाश्ता किंवा जेवणाची सोय होऊ शकते. त्यासाठी आगाऊ सूचना द्यावी लागते.

गावाजवळून एक वाट पुढे तेलबेलच्या पठारावर जाते. विस्तीर्ण गवताळ पठारावर अर्धा तास पायपीट केली की, आपण सह्याद्रीच्या पश्‍चिम धारेवर पोचतो. तिथून खाली कोकणचे दृश्य अनुभवता येते. प्राचीन काळातल्या सवाष्णीचा घाट आणि वाघजाई घाट या दोन घाटवाटा इथून कोकणात उतरतात. प्राचीन काळी या घाटवाटांवर टेहळणीकरिताच या किल्ल्याचा उपयोग होत असावा.

अधिक वेळ असेल तर या पठारावर तंबू लावून मुक्कामही करता येतो. जेवणाची आणि पाण्याची सोय स्थानिकांच्या मदतीने स्वतःलाच करावी लागते. घाटाच्या धारेवरून सूर्यास्ताच्या वेळी अद्‍भुत नजारा अनुभवण्यास मिळतो. याच धारेवरून खाली उतरून पंधरा मिनिटांच्या अंतरावर वाघजाईचं मंदिर आहे. अस्ताला जाणारा सूर्य, त्याचे मावळतीचे रंग, बेफाम वारा, क्षितिजावरची लाली ती संध्याकाळ अविस्मरणीय करून जाईल. आसपास कृत्रिम प्रकाश खूप कमी असल्याने रात्री आकाशनिरीक्षणाकरिताही ही जागा अतिशय योग्य आहे. उघड्या आकाशात असंख्य तारे, आकाशगंगा, नक्षत्रे यांची रांगोळी, थंड वातावरण, रंगलेल्या गप्पा अशा अनुभवासाठी तेलबेलच्या परिसराला एकदा तरी नक्की भेट द्यायला हवी.

 

काय काळजी घ्याल?

खिंडीत जाताना किंवा पठारावर मुक्काम करताना स्थानिकांना कल्पना द्यावी.आपले तंबू आणि बिछाना स्वतः घेऊन जावे.पठारावर सर्वत्र गवत असल्याने तिथे आग पेटवू नये.सोबत स्थानिक गाइड अवश्य असावा.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News