'खेलो इंडिया' मध्ये तलवारबाजी स्पर्धेत तुषारची सुवर्ण कामगिरी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 February 2020

राष्ट्रीयस्तरावरील ‘खेलो इंडिया’मध्ये तलवारबाजी स्पर्धेत विद्यापीठाच्या संघाने पहिल्यांदाच सहभाग नोंदवला व सुर्वणपदक मिळविले.

औरंगाबाद : भुवनेश्वर येथे १७ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या पहिल्या खेलो इंडिया स्पर्धेला सुरवात झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा तलवारबाज तुषार आहेर याने रविवारी झालेल्या तलवारबाजीच्या वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. त्याला नुकताच शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला आहे. 

राष्ट्रीयस्तरावरील ‘खेलो इंडिया’मध्ये तलवारबाजी स्पर्धेत विद्यापीठाच्या संघाने पहिल्यांदाच सहभाग नोंदवला व सुर्वणपदक मिळविले. या स्पर्धेत तुषारने साखळी फेरीमध्ये सर्व सामने जिंकून प्रथम स्थान पटकावले. बाद फेरीच्या उपांत्य सामन्यात तुषारने चंदीगड विद्यापीठाच्या अमितचा १५- ९ गुणांनी पराभव करून उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीतही शिवाजी विद्यापीठाच्या विपूल येडेकरचा १५-४ गुणांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

अंतिम सामना अमृतसरच्या गुरुनानक देव विद्यापीठाच्या तारिक हुसेनसोबत अत्यंत अटीतटीचा झाला. तारिकने सुरवातीला ६-४ अशी आघाडी घेतली. नंतर तुषारने १३- ११ अशी आघाडी घेतली व नंतर दोघांनाही  १४-१४ असे समान गुण होते. शेवटचा निर्णायक गुण घेऊन तुषारने १५-१४ अशा गुणांनी सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते मार्गदर्शक डॉ. उदय डोंगरे यांचे तुषारला मार्गदर्शन लाभले. 

संघासोबत असलेले प्रशिक्षक डॉ. पांडुरंग रानमाळ, डॉ. दिनेश वंजारे व व्यवस्थापक डॉ. सुहास यादव यांचेही त्याला मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र.कुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ. साधना पांडे, क्रीडा संचालक डॉ. कल्पना झरीकर यांनी तुषारचे कौतुक केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News