जन्माला येणाऱ्या हजार मुलांपैकी तीन मुलांमध्ये श्रवणदोष

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 March 2020

श्रवणदोष घेऊन जन्माला येणाऱ्या बालकांचे वेळीच निदान करून कॉकलिअर इम्प्लांटच्या माध्यमातून त्यांचे भविष्यातील अपंगत्व दूर करता यावे यासाठी राज्यात सात सरकारी आणि २८ खासगी रुग्णालयात ही सोय करण्यात आली.

 नागपूर : जन्माला येणाऱ्या दर हजार चिमुकल्यांमध्ये तीन मुलांमध्ये श्रवणदोष असल्याचे वैद्यकशास्त्र सांगते. उपराजधानीचा विचार करता दरवर्षी ५० ते ६० हजार प्रसूती येथे होतात. यातील २०० मुलांना श्रवणदोष असण्याची दाट शक्‍यता असते. यात जोखमीच्या मुलांमध्ये हे प्रमाण अधिक असते.  

जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने ३ मार्च हा दिवस जागतिक श्रवणदिन म्हणून घोषित केला आहे. जगात कोट्यवधी लोक कर्णबधिर आहेत. अविकसित आणि विकसनशील देशांत कर्णबधिरपणा तपासणी आणि तंत्रज्ञानाबाबत सामान्य जनता अद्याप अनभिज्ञ आहे. यासंदर्भात जनजागरणासाठी यंदा जागतिक आरोग्य संघटनेने ‘श्रवण क्षमता तपासणी’ हे ध्येय घेऊन प्रचार-प्रसार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मेयो आणि मेडिकलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या पार्श्‍वभूमीवर कान-नाक-घसारोग तज्ज्ञ डॉ.कांचन तडके यांच्याशी संवाद साधला.  कानाच्या पडद्यामार्फत ध्वनीची कंपने मेंदूपर्यंत पोहोचतच नसल्याने ही मुले भविष्यातील अपंगत्वाच्या जोखमीवर उभी होती.मात्र, कॉकलिअर इम्प्लांटचे वेळीच प्रत्यारोपण झाल्याने त्यांच्यात पुन्हा आत्मविश्‍वासाचे बळ फुंकणे शक्‍य झाले आहे.

अलीकडे जन्मत: विविध प्रकारच्या अपंगत्वाशी झुंजणाऱ्यांना पुन्हा सन्मानाने जगता यावे, यासाठी केंद्र सरकारने दिव्यांगांसाठी सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाच्या अखत्यारीत दिव्यांग सक्षमीकरण मंत्रालयाची पायाभरणी केली. यामाध्यमातून बहुविकलांगमुलांसाठी चेन्नईत निपमॅड अर्थात (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मल्टिपल डिसॅबलिटी), गतिमंद मुलांसाठी सिकंदराबाद येथे एनआयएमएच (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंटलेक्‍चुअल डिसॅबलिटी), अस्थिव्यंगत्व घेऊन जन्माला येणाऱ्या मुलांसाठी नवी दिल्ली येथे पंडित दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूट ऑफ पर्सन विथ फिजिकल डिसॅबलिटी), दृष्टीहीन बालकांसाठी डेहराडून येथ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हिज्युअली डिसॅबल पर्सन, दिव्यांग बालकांच्या पुनर्वनसनासाठी ओडिशातील कटक येथे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिहॅबिलिटेशन सेंटर तर कर्णबधिर मुलांसाठी नवी दिल्ली येथे इंडियन साइन लॅग्वेज रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग सेंटर असे सात विभाग स्वतंत्र सुरू केले आहेत. 

 

मेयो-मेडिकलमध्ये कॉकलिअर इम्प्लांटची सोय 

श्रवणदोष घेऊन जन्माला येणाऱ्या बालकांचे वेळीच निदान करून कॉकलिअर इम्प्लांटच्या माध्यमातून त्यांचे भविष्यातील अपंगत्व दूर करता यावे यासाठी राज्यात सात सरकारी आणि २८ खासगी रुग्णालयात ही सोय करण्यात आली. नागपूरच्या मेयो आणि मेडिकलमध्ये ही सोय आहे. मेयो रुग्णालयात ३२ तर मेडिकलमध्ये ३० चिमुकल्यांना, तर उर्वरित ९० चिमुकल्यांना खासगी रुग्णालयात कॉकलिअर इम्प्लांट करीत श्रवणदोष मुक्त करण्यात आले आहे.

बहिरेपणामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी योग्यवेळी श्रवणक्षमता तपासणी करावी. मेडिकलमध्ये प्रत्येक बाळाची श्रवणक्षमता तपासणी करणे आवश्‍यक आहे. मात्र, ते शक्‍य
नसल्यामुळे ज्या बाळांमध्ये जोखीम असते, अशा बाळांसाठी ‘ओएई’, ‘बेरा’ चाचणीची सोय मेडिकलमध्ये आहे. जोखमीच्या बाळांमध्ये गर्भवती मातेचे कुपोषण,  गर्भाची अपुरी वाढ,
जन्माच्या वेळी वजन कमी, ही कारणे आहेत. विद्यार्थ्यांना सर्दी, घशाचा संसर्ग यामुळे बहिरेपणा येतो.
-डॉ. कांचन तडके, सहयोगी प्राध्यापक,
 कान-नाक-व घसारोग विभाग, मेडिकल

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News