विद्यार्थ्यांना व्हॉटस्‌ॲपच्या माध्यामातून शिकवा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 20 March 2020
  • पालकांसाठी वर्गनिहाय व्हॉटस्‌ॲप ग्रुप करावेत. व्हॉटस्‌ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुटीच्या काळातील अभ्यासाचे वेळापत्रक पालकांना द्यावे.

सातारा :  जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडू नये, यासाठी शाळा आणि शिक्षकांनी व्हॉटस्‌ॲपच्या माध्यमातून संपर्कात राहावे, तसेच अभ्यास, खेळ आदींबाबत सूचना द्यावेत, असा आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी आज एका परिपत्रकाद्वारे काढला आहे. 

पालकांसाठी वर्गनिहाय व्हॉटस्‌ॲप ग्रुप करावेत. व्हॉटस्‌ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुटीच्या काळातील अभ्यासाचे वेळापत्रक पालकांना द्यावे. दरारोज कोणत्या विषयाचा व कोणकोणत्या घटकाचा अभ्यास-सराव करावयाचा आहे, याची ग्रुपच्या माध्यमातून कल्पना द्यावी. आठवड्यातून एकदा छोट्या स्वरूपातील सराव चाचणी विषयनिहाय द्यावी. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी चित्र रंगवा या उपक्रमांतर्गत वयोगटानुसार कला विषय असलेल्या शिक्षकांनी दररोज एक चित्र उपलब्ध करून द्यावे. विद्यार्थ्यांना घरी बसून करता येतील, असे वर्गनिहाय कार्यानुभवाचे उपक्रम द्यावेत. 

विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी पीडीएफ स्वरूपात शक्‍य असल्यास पुस्तके उपलब्ध करून द्यावीत (वयोगटानुसार). अवांतर वाचनाच्या पुस्तकांची यादी देण्यात यावी. वैयक्तिक स्वच्छता या विषयी ग्रुपवर माहिती द्यावी. नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम उपक्रम एकमेकांना शेअर करावेत. घरबसल्या कोणते उपक्रम राबवता येतील याची माहिती द्यावी. टीव्ही व मोबाईलपासून विद्यार्थ्यांनी दूर राहण्यासाठी मनोरंजनात्मक बैठे खेळ सूचवावेत. (दररोज एक खेळ देणेत यावा).

आई, वडिलांना कामात मदत करणे, घर व परिसर स्वच्छ ठेवणे स्वतःची कामे स्वतः करणे यासाठी प्रोत्साहित करणे. आरोग्य उत्तम राहण्यासाठी ओंकार, योगासने, प्राणायम, आनापान, ध्यान याबाबत माहिती देण्यात यावी. घरबसल्या खेळ खेळू शकतील याची माहिती विद्यार्थ्यांना द्यावी, तसेच अनावश्‍यक पोस्ट ग्रुपवर टाकू नयेत, असेही निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. दरम्यान, दीक्षा ॲप आणि एएलओज स्मार्ट क्‍यू ॲप विद्यार्थ्यांनी वापरावे, यासाठी प्रोत्साहान द्यावे. 

हा उपक्रम करताना कोणावरही सक्ती करू नये. विद्यार्थी अभ्यासग्न राहतील, यासाठी घरबसल्या जे उपक्रम करता येतील ते देण्याचा प्रयत्न करावा, तसेच या उपक्रमासाठी शाळेतील शिक्षकांचे साहाय्य घेतले, तरी कोणत्याही प्रकारची हरकत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News