'या' शाळेत घडवले जातात यशस्वी उद्योजक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 31 January 2020
  •  विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणांसोबत कौशल्य विकासाला चालना मिळत आहे. तीन महिन्यांत ७० हजार रुपये किमतीच्या वस्तू विद्यार्थ्यांनी तयार केल्या आहेत. कार्बाईड बंदूक वन्य प्राण्यांपासून पीक संरक्षणासाठी उपयुक्त ठरणार आहे. 
     

सेनगाव : तालुक्याच्या ठिकाणी १९९८ मध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापना झाली. प्रारंभी या संस्‍थेचा कारभार बाजार समितीच्या प्रांगणात सुरू झाला. त्यानंतर शहरालगत स्वतंत्र इमारतीमध्ये संस्था स्थलांतरित करण्यात आली. या ठिकाणी वीजतंत्री, इलेक्ट्रॉनिक्स, फिटर, सधांता, ड्रेस मेकिंग हे अभ्यासक्रम शिकविले जात असून ८० विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. प्राचार्य म्हणून रविराज बोथीकर कार्यरत आहेत.

तालुक्यात ग्रामीण व दुर्गम भाग जास्त असल्यामुळे व्यवसायिक शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल काही प्रमाणात कमी आहे. येथील शिक्षक व अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत कौशल्य विकासासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. या संस्थेत टाकाऊ लोखंडी साहित्य भरपूर आहे. त्यापासून टिकाऊ वस्तू बनविण्याचा उपक्रम विद्यार्थ्यांनी हाती घेतला आहे. तीन महिन्यांत संस्थेच्या प्रवेशद्वारावरील मोठा नामफलक, सूचनाफलक, अनविल स्टॅन्ड, स्क्राप बिम, वेल्डिंग स्टॅन्ड, पाण्याच्या फ्रीजसाठी शेड, फायर बकेट स्टॅन्ड, सर्फेस प्लेट स्टँड, गवत कटर यंत्र यासह अनेक विविध वस्तू बनविल्या आहेत. या वस्तू टिकाऊ झाल्या असून त्याचा वापरही प्रशिक्षणासाठी होत आहे. दरम्यान, जवळपास ७० हजार रुपये किमतीच्या वस्तू आहेत.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात रानडुक्कर, वानर, हरीण, रोही यासह विविध वन्य प्राणी आहेत. या वन्य प्राण्यांचा मुक्त संचार राहत असल्याने शेती पिकांचे अतोनात नुकसान होते. प्राण्यांना हुसकावून लावण्यासाठी शेतकरी फटाके फोडतात. मात्र, त्यामुळे फारसा उपयोग होत नाही. येथील विद्यार्थ्यांनी शेती पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे, या उद्देशाने कार्बाइड बंदूक तयार केली आहे. अत्यंत कमी खर्चात या बंदुकीचा आवाज दीड किलोमीटरपर्यंत जातो. अवघ्या ४०० रुपयांत बंदूक बनली आहे. या बंदुकीला शेतकऱ्यांकडून मोठी मागणी होत आहे. बंदुकीची निर्मिती करून विक्रीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे.

येथील संस्थेत सर्वच मशीन शंभर टक्के सुरू आहेत. त्याचा वापर विद्यार्थी प्रशिक्षणासाठी करतात. विशेषता महाराष्ट्रातील एकाही संस्थेत प्लाझमा आर कटिंग मशीन सुरू नाही. परंतु, येथे मशीन सुरू असून कार्यरत आहे. नाविन्यपूर्ण वस्तू तयार करण्यात विद्यार्थी मग्न राहतात. शिक्षण पूर्ण करून नोकरी नाही मिळाली तरी सुद्धा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची जिद्द विद्यार्थ्यांत विकसित होत असल्याचे चित्र आहे. यासाठी शिल्प निर्देशक व्ही. व्ही. ढाले, तांत्रिक निर्देशक बी. बी. पाचुंगे, कर्मचारी एम. पी. चव्हाण, पी. व्ही. हणवते, पी. एस. महाले, श्री. धाऊगर यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News