केंद्र सरकारकडून विद्यार्थ्यांसाठी 'स्टुडंट पोलीस कॅडेटचा' उपक्रम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 February 2020

शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणारी विविध मूल्ये त्यांच्यामध्ये रुजावीत, त्याचबरोबर विविध उपक्रमांत पोलिसांना सहकार्य करण्यासाठी या कॅडेटचे सहकार्य मिळणार आहे.

अलिबाग : पोलिस दलाच्या आधुनिकीकरणांतर्गत स्टुडंट पोलिस कॅडेट कार्यक्रम राबवण्यात येत असून, यासाठी रायगड जिल्ह्यातील सहा शाळांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक शाळेसाठी ५० हजार रुपये केंद्र सरकारच्या हिस्स्यातून मिळणार आहे. हा निधी विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी वापरला जाणार आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणारी विविध मूल्ये त्यांच्यामध्ये रुजावीत, त्याचबरोबर विविध उपक्रमांत पोलिसांना सहकार्य करण्यासाठी या कॅडेटचे सहकार्य मिळणार आहे.

निवडक विद्यार्थ्यांची यासाठी निवड करत त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पोलिसांचे कामकाज, शिस्त, कर्तव्य याविषयी माहिती देताना गुन्ह्यांना आळा कसा घालावा, नागरिकांची सुरक्षितता कशी जपावी, आपत्ती काळात नागरिक म्हणून आपली भूमिका याविषयी माहिती देण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील ६५० सरकारी शाळांमधील आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यातील या शाळांसाठी केंद्र सरकारच्या हिस्स्यातील ३ कोटी २५ लाख रुपये मिळणार आहेत. रायगडमधून सहा विद्यालयांचा समावेश करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ‘स्टुडंट पोलिस कॅडेट’ उपक्रम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक काम पाहत आहेत. या माध्यमातून गुन्ह्यास प्रतिबंध करणे, रस्ते सुरक्षा आणि वाहतूक जागरूक, भ्रष्टाचार निर्मूलन संवेदनशीलता आणि सहानुभूती, महिला आणि बालकांची सुरक्षितता, दृष्ट प्रवृत्तीस आळा घालणे, नीतिमूल्य, शिस्त, आपत्ती व्यवस्थापन आणि स्वच्छता या विषयांवर मुलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी वन आणि पर्यावरण, युवा कल्याण, परिवहन, शालेय शिक्षण, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दलाची मदत घेण्यात
आली आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News