कोरोना रोखण्यासाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 16 March 2020
  • कोरोना या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देश व राज्य पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

कर्जत : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण होणे आवश्‍यक आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्‍यातील तिघर जिल्हा परिषदेच्या शाळांनी पुढाकार घेत मास्क बनवण्याची कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने चांगले मास्क बनवले.

कोरोना या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देश व राज्य पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सॅनिटायझर आणि मास्कची बाजारपेठेत वाढत चाललेल्या मागणीवरून तुटवडा जाणवू लागला आहे. याच पार्श्‍वभूमीवर तिघर शाळेत मास्क बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. 

शिक्षिका सविता खडे व योगिता अहिरराव यांनी विद्यार्थ्यांना मास्क बनवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. या वेळी विद्यार्थ्यांनी व सर्व शिक्षकांनी स्वतः मास्क तयार केले.  मास्क बनवण्यासाठी लागणारे सुती कापड, सुई, दोरा, इलेस्टिक दोरा इत्यादी साहित्य शिक्षकांनी स्वतः उपलब्ध करून दिले. मास्क बनवून झाल्यानंतर याचा उपयोग आपणही गर्दीच्या ठिकाणी करू शकतो, असे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितले. 

या कार्यशाळेसाठी भिसेगाव केंद्राच्या केंद्रप्रमुख नलिनी साळोखे, तिघर शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर इंगळे, विषय शिक्षिका सविता खडे उपशिक्षिका योगिता अहिरराव, उपशिक्षिक जनार्धन पजई सहभागी  झाल्या होत्‍या.

घ्यावयाची काळजी

वारंवार हात धुणे, शिंकताना व खोकताना रुमालाचा वापर करणे किंवा मास्क घालणे, आजारी असताना शाळेत येणे टाळणे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे, वारंवार तोंड, डोळे व नाक यांना हात न लावणे. ताप, सर्दी खोकला असणाऱ्या व्यक्तीपासून एक मीटर दूर राहणे. गरज असल्यास त्वरित नजीकच्या दवाखान्यात भेट देणे आदी बाबी कोरोना आजार रोखण्यासाठी उपयुक्त आहे, अशी माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News