चादंवड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लावला शेतीसाठी स्मार्ट शोध

हर्षल गांगुर्डे
Tuesday, 18 February 2020

मेक इन इंडिया चळवळीला बळ देण्यासाठी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी अतिशय कमी खर्चात तंत्रज्ञान विकसित केले आहे. याचा उपयोग करून शेतकरी कमीत कमी खर्चात जास्तीत उत्पन्न घेऊ शकतात. शासन व उद्योजकांची मदत घेऊन हे प्रकल्प जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचा आमचा मानस आहे.
- दिनेश लोढा, समन्वयक, अभियांत्रिकी विद्यालय, चांदवड

आमचे विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्याने नेहमी प्रोजेक्‍ट बनवीत असतात. शेतकऱ्यांसाठी सोपे व स्वस्त तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम करतात. मागील तीन ते चार वर्षांपासून ऊस, कांदा विविध प्रकारच्या पिकांसाठी उपयुक्त प्रकल्प विकसित केले आहेत.
-प्रा. व्ही. सी. जाधव 

गणूर : मोटेपासून मोटारीपर्यंत, लोखंडापासून तर ट्रॅक्‍टर नांगरापर्यंत, पारंपरिकपासून तर शेडनेटपर्यंत, गावराणपासून हायब्रिडपर्यंत शेतीने अनेक बदल स्वीकारले. हे शक्‍य झाले तंत्रज्ञानामुळे. बदलत्या दुनियेबरोबर शेतीही स्मार्ट होतेय. असाच स्मार्ट शोध चांदवड अभियांत्रिकी महाविद्यालयातील शेतकऱ्यांच्या लेकरांनी लावला असून, त्यांनी स्मार्ट मका पेरणीयंत्र तयार केले आहे.

मुंबईला झालेल्या राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेत यंत्राने प्रथम पारितोषिक मिळविले. वेस्ट झोन इंडिया आविष्कार स्पर्धेसाठी यंत्राची निवड झाली आहे. यंत्रनिर्मितीत सागर ठाकरे, दिनकर सहाने, कृष्णा खंगाळ, अमोल आहेर, प्रियंका निफाडे व प्राची खिवंसरा यांनी योगदान दिले. त्यांना प्रा. विनयकुमार जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

हे यंत्र मका, सोयाबीन, मूग, हरभरा, तूरडाळ, भुईमूग अशा विविध पिकांच्या पेरणीसाठी बनविले आहे. यंत्राच्या सहाय्याने सरी पाडणे, खत टाकणे, माती बुजविणे व पेरणे या प्रकारची कामे केली जातात. यंत्रात न्यूमॅटिक व्हॅक्‍यूम जनरेटर तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे. यंत्रातील एनपीके सेन्सरच्या मदतीने शेतकरी शेतीतील मूलद्रव्ये व अन्नघटकांची चाचणीही करू शकतात व त्याआधारे दिल्या जाणाऱ्या खतांची मात्रा ठरवू शकतात. यामुळे जमिनीची सुपीकता टिकविण्यास मदत होते.

संपूर्णतः स्वयंचलित यंत्र असल्याने १० ते १२ मजुरांची कामे यंत्राद्वारे केली जाऊ शकतात. त्यामुळे हेक्‍टरी येणारा १० ते १२ हजारांचा खर्च कमी होऊन अवघ्या तीन ते चार हजार रुपयांत एक हेक्‍टर पिकाची पेरणी होऊ शकते. यंत्र बनविण्यासाठी विद्यार्थ्यांना साधारणत: ३५ हजार रुपये खर्च आला. हा प्लांटर ट्रॅक्‍टरला जोडून चालविला जातो. याबद्दल संस्थाध्यक्ष बेबीलाल संचेती, प्रबंध समिती अध्यक्ष अजित सुराणा, समन्वयक दिनेशकुमार लोढा, झुंबरलाल भंडारी, सुनील चोपडा, प्राचार्य एम. डी. कोकाटे, यंत्र अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. एस. डी. संचेती व सर्व विभागप्रमुखांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News