'या' कारगिल हिरोच्या भूमिकेत दिसणार सिध्दार्थ मल्होत्रा

 सुशील आंबेरकर
Monday, 27 January 2020

कारगिलच्या युद्धभूमीवरील त्यांचा पराक्रम मोठ्या ताकदीने पडद्यावर दिसणार आहे. सिद्धार्थच्या बरोबरीने कियारा अडवाणीही सिनेमात आहे. सिद्धार्थने सिनेमासाठी खडतर प्रशिक्षण घेतल्याचं सांगितलं जातंय.

आगीचा उडणारा लोळ, बॅकग्राऊंडला गिटारीतून उमटणारी निराशात्मक सुरावट आणि युद्धाचं वर्णन ऐकवणारे काळजाचा ठाव घेणारे बोल... सिद्धार्थ मल्होत्राच्या नवीन ‘शेरशाह’ चित्रपटाचा टिझर पाहताच अंगावर शहारा येतो. आपण सर्वांनी कारगिल युद्धाबद्दल ऐकलं आहे. १९९९ मध्ये दुश्‍मन देश पाकिस्तानने अचानक आपली लष्करी फौज एलओसी पार करून भारतात पाठवली. भारतीय लष्कराने त्यांचा मोठ्या धाडसाने सामना केला अन्‌ तिरंगा फडकावला. कॅप्टन विक्रम बत्रा कारगिल युद्धाचे हिरो ठरले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराने पाकिस्तानला पाणी पाजलं. अशी ही ‘अनटोल्ड स्टोरी ऑफ कॅप्टन विक्रम बत्रा’ ‘शेरशाह’ मध्ये दिसणार आहे. 

निर्माता करण जोहर ‘शेरशाह’ घेऊन येतोय. टिझरमध्ये तरी सिद्धार्थ परफेक्‍ट लष्करी अधिकारी वाटतोय. त्याचा लूक बत्रा यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जवळ जाणारा आहे. बर्फाळ युद्धभूमीवरील भेदकता छोट्याशा टिझरवरूनही जाणवतेय. ‘परमवीरचक्र’ विक्रम बत्रा यांचे शौर्य जाणून घ्यायची उत्सुकता वाढते ती त्यामुळेच. कारगिलच्या युद्धभूमीवरील त्यांचा पराक्रम मोठ्या ताकदीने पडद्यावर दिसणार आहे. सिद्धार्थच्या बरोबरीने कियारा अडवाणीही सिनेमात आहे. सिद्धार्थने सिनेमासाठी खडतर प्रशिक्षण घेतल्याचं सांगितलं जातंय.

श्रीनगर-लेह मार्गावरील ‘पॉईंट ५१४०’वर असलेल्या पाक सैनिकांना हुसकावण्याची अवघड कामगिरी पार करून तिथे तिरंगा फडकावल्यानंतर बत्रा यांचं वाक्‍य होतं, ‘ये दिल माँगे मोर...’ त्यानंतर ‘पॉईंट ४८७५’वर ताबा मिळवल्यावरच त्यांनी देह ठेवला. त्यांच्या असीम देशप्रेमाला अन्‌ अतुलनीय शौर्याला ‘शेरशाह’तून आदरांजली वाहण्यात आली आहे. 

युद्धाच्या वेळी बत्रा अवघ्या २४ वर्षांचे होते. त्यांचा दरारा एवढा होता, की युद्धादरम्यान पाकिस्तानी लष्कराने त्यांना ‘शेरशाह’ असं कोडनेम दिलं होतं... युद्धात त्यांनी ते सिद्ध करून दाखवलंच. ३ जुलै २०२० रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News