आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेत तिने पटकावला छत्रपती पुरस्कार

नरेंद्र चोरे
Monday, 2 March 2020

खेळ म्हटला की, उपराजधानीतील मुले-मुली ॲथलेटिक्‍स, बॅडमिंटन, बुद्धिबळ, स्केटिंगसह कबड्डी व खो-खोसारख्या ग्लॅमरस देशी खेळांकडे धावतात. परंतु, दामिनीने थोडा ‘हटके’ खेळ निवडला. या खेळात ना ग्लॅमर ना पैसा. पण, तरीही तिने यात करिअर करण्याचा धाडसी निर्णय घेतला. कुटुंबीयांचे पाठबळ, गुरूची साथ आणि मैदानावर दिवसरात्र गाळलेला घाम, या जोरावर तिने अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय खेळाडू होण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले.

नागपूर : वडिलांचा पानठेल्याचा व्यवसाय आणि आई गृहिणी. घरात कुणालाही खेळाचा गंध नाही. अशा परिस्थितीत तिने तलवारबाजीसारखा दुर्लक्षित खेळ निवडला. मुलीच्या पाठीशी अख्खा  परिवार खंबीरपणे उभा राहिला. तिने जिद्दीने एकेक पायरी चढत थेट केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावरच झेप घेतली नाही, तर देशासाठी पदक जिंकून आपल्या परिवारासह उपराजधानीच्याही शिरपेचात मानाचा तुरा खोवला. संघर्षमय कहाणी आहे तांडापेठसारख्या मागासलेल्या वस्तीत राहणारी युवा महिला तलवारपटू  व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या दामिनी रंभाडची.

खेळ म्हटला की, उपराजधानीतील मुले-मुली ॲथलेटिक्‍स, बॅडमिंटन, बुद्धिबळ, स्केटिंगसह कबड्डी व खो-खोसारख्या ग्लॅमरस देशी खेळांकडे धावतात. परंतु, दामिनीने थोडा ‘हटके’ खेळ निवडला. या खेळात ना ग्लॅमर ना पैसा. पण, तरीही तिने यात करिअर करण्याचा धाडसी निर्णय घेतला. कुटुंबीयांचे पाठबळ, गुरूची साथ आणि मैदानावर दिवसरात्र गाळलेला घाम, या जोरावर तिने अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय खेळाडू होण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले. दामिनीच्या ‘स्पोर्टस करिअर’ची सुरुवात तशी मजेशीरच म्हणावी लागेल. 

२००५ मध्ये हिंदू मुलींच्या शाळेत शिकत असताना तलवारबाजीच्या प्रशिक्षक स्नेहलता भगत यांनी पहिल्यांदा शाळेत तलवारबाजीचा खेळ आणला. हा खेळ वेगळा वाटल्याने दामिनीने यात रुची दाखविली. अवघ्या दोन वर्षांत तिने राज्य स्पर्धेपर्यंत मजल मारली. मात्र, त्यानंतर तिचे मन या खेळात रमले नाही आणि शिक्षणावर ‘फोकस’ करण्याचा निर्णय घेतला. वर्षभर मैदानापासून दूर राहिल्यानंतर खेळाचा किडा पुन्हा वळवळला आणि ती पुन्हा मैदानात उतरली. यावेळी तिने अजिबात मागे वळून पाहिले नाही. 

भंडारा येथे झालेल्या १७ वर्षांखालील राज्य स्पर्धेतील सुवर्णपदक जिंकल्यानंतर राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकण्याचा धडाका सुरू ठेवत आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली. हैदराबादमधील दक्षिण आशियाई स्पर्धेतील ब्राँझपदक तिची आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील आजवरची सर्वांत मोठी कमाई आहे. याशिवाय २०१८ मध्ये चीन येथे झालेल्या ग्रॅण्डप्रिक्‍स स्पर्धेतही तिने देशाचे प्रतिनिधित्व केले. २६ वर्षीय दामिनीने आतापर्यंत विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आठ सुवर्णांसह एकूण २४ पदके जिंकली आहेत. तर राज्य स्पर्धांमध्येही तिच्या नावावर २५ सुवर्णांसह ६२ ‘मेडल्स’ आहेत.

दामिनीचे ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची खूप इच्छा होती. पण, अथक प्रयत्न करूनही ती  तिथपर्यंत पोहोचू शकली नाही. ती अजूनही आशावादी आहे. माझ्याकडे अजूनही दोन-तीन वर्षे आहेत. या काळात प्रयत्न करेल. दुर्दैवाने प्रयत्नांना यश आले नाही, तर प्रशिक्षक बनून ऑलिम्पिक दर्जाचा खेळाडू घडवेल, अशी इच्छा तिने बोलून दाखविली. दामिनीकडून तलवारबाजीचे धडे गिरविणारा तिचा ज्युनियर प्रणय पिंपळवारकडून तिला अपेक्षा आहे. संयुक्‍त परिवारात जन्मलेल्या दामिनीला मायबापाच्या कष्टाची व परिस्थितीची जाणीव आहे. त्यामुळेच सर्वांत लहान असूनही ती सोनेगाव येथील एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेसमध्ये सेक्‍युरिटी विभागात नोकरी करून आपल्या परिवाराला आर्थिक हातभार लावत आहे. 

‘छत्रपती’मुळे मिळेल ‘मोटिव्हेशन’

तलवारबाजीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल दामिनीला नुकतेच राज्य शासनातर्फे प्रतिष्ठेचा छत्रपती क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार माझ्या आतापर्यंतच्या कामगिरीचे फळ असून, त्यामुळे मला भविष्यात चांगल्या कामगिरीसाठी आणखी ‘मोटिव्हेशन’ मिळेल, असे ती म्हणाली. पुरस्कार वितरणप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘घे ताई’ हे दोन शब्द माझ्यासाठी भावनिक प्रसंग होता. तो क्षण मी आयुष्यात कदापि विसरू शकत नाही. आईबाबा, भाऊ, काका व परिवारातील अन्य सदस्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप ठेवावी, यापेक्षा दुसरा आनंद असूच शकत नाही, असे तिने सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News