विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती ठरली कसरतीची

संतोष विंचू
Tuesday, 4 February 2020
  • नॅक मूल्यांकन अनिवार्य केल्यानुसार मानांकन प्राप्त करून घेण्याची जबाबदारी त्या-त्या संस्था व महाविद्यालयाची असते. त्यांनी हे काम वेळेत केलेच पाहिजे. अन्यथा इतर पर्याय शोधावेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या नैसर्गिक न्याय्य हक्कांपासून वंचित ठेवणे योग्य ठरणार नाही.

येवला : चार वर्षांपूर्वी तंबी देऊनही व्यावसायिक अभ्यासक्रम राबविणाऱ्या अनेक महाविद्यालयांनी नॅक किंवा एनबीए मूल्यांकन करून घेत दर्जा निश्‍चित न केल्याने जिल्ह्यातील शंभरवर महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर पाणी सोडावे लागणार आहे. व्यावसायिक महाविद्यालयांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी आता समाजकल्याण विभागच पुढे सरसावला असून, मूल्यांकन व दर्जाचे प्रमाणपत्र सादर न केल्यास विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क बंद करण्याची भूमिका घेतल्याने अनेक महाविद्यालयांचे धाबे दणाणले आहे.

नॅशनल असेसमेंट ॲन्ड क्रिडिटेशन कौन्सिलकडून गुणवत्ता व सोई-सुविधांचे मूल्यांकन करून घेणे अनिवार्य आहे. विविध विद्याशाखांच्या अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयांना पदवी परीक्षेच्या दोन बॅच उत्तीर्ण झाल्यावर मूल्यांकन करावे लागते. तर व्यावसायिकमध्ये अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्‍चर आदी महाविद्यालयांना नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडिटेशनकडून किंवा नॅकही करावे लागते. शासनासह तंत्रशिक्षण मंडळ आणि विद्यापीठांनी देखील सर्वच महाविद्यालयांना वेळोवेळी प्रवेशप्रक्रिया रोखणे, शिक्षकांच्या मान्यता न देणे असे अडथळे आणून मूल्यांकन करणे सक्तीचे केले आहे. तरीदेखील अनेकांनी याकडे कानाडोळा केल्याचे दिसते. या संदर्भात सामाजिक न्याय विभागाच्या २०१६ मधील शासन निर्णयात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क व प्रतिपूर्तीच्या योजनेचे धोरण ठरविले होते. त्यामध्ये पुढील तीन वर्षाच्या आत महाविद्यालयांनी सक्षम शिखर संस्थेकडून मूल्यांकनाचा दर्जा प्राप्त करून न घेतल्यास २०१९-२० पासून मूल्यांकन होईपर्यंत योजनेतून वगळण्यात येईल असे स्पष्ट केले होते. 

नाशिकच्या समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त प्राची वाजे यांनी थेट व्यावसायिक महाविद्यालयांना आता स्वतंत्रपणे पत्र देऊन मूल्यांकन व दर्जाचे प्रमाणपत्र सादर करा, तरच विद्यार्थ्यांचे शुल्क प्रतिपूर्तीचे अर्ज निकाली काढण्यात येतील, अशा सूचना दिल्या आहेत. शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून हा निकष प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू होणार आहे. सोयीसुविधा नसल्याने इतके वर्ष चालढकल करणाऱ्या शिक्षणसंस्था व महाविद्यालयांचे या निर्णयामुळे धाबे दणाणले आहे. 

शिक्षणशास्त्र गुलदस्त्यात... 
राज्यातील बी. एड. महाविद्यालयांचे मूल्यांकन काढून क्‍यूसीआयकडे देण्यात आले आहे. या निर्णयानुसार दोन वर्षांपासून अनेक महाविद्यालयांनी मूल्यांकनासाठीचे शुल्कदेखील भरलेले आहे. परंतु मूल्यांकन करण्यासाठी क्‍यूसीआयने वेळकाढूपणा चालवल्याने आता शिक्षणशास्त्र महाविद्यालयांनी काय करावे, असाही प्रश्‍न पडला आहे. किंबहुना, यापूर्वी ज्यांचे मुल्यांकन झाले, त्यांनाही हा निर्णय लागू होणार की नाही याबाबतही संभ्रमावस्था आहे.

काय आहे नॅक
महाविद्यालयाच्या दर्जासाठी नॅक मूल्यांकन आवश्‍यक आहे. महाविद्यालयाची गुणवत्ता, सोयीसुविधा, इमारत दर्जा, ग्रंथालय संपदा, पायाभूत सुविधा,विद्यार्थ्यांना नोकरीची उपलब्धता, प्राध्यापकांची संख्या व गुणवत्ता या सर्वांचा विचार करून ‘नॅक’कडून महाविद्यालयांना श्रेणी दिली जाते. 

जिल्ह्यात​ विक्रमी संख्या
नाशिक जिल्ह्यात १९० महाविद्यालये असून, यापैकी जवळपास ६४ महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन, तर १२ व्यवसायिक महाविद्यालयांनी एनबीए मूल्यांकन केले आहे. उर्वरित ११० महाविद्यालयांना शिष्यवृत्तीवर पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते. असे झाल्यास विद्यार्थ्यांनाही प्रवेश घेताना चार वेळेस विचार करावा लागेल. त्यामुळे समाजकल्याणचे पत्र मिळताच महाविद्यालयांची मूल्यांकनाच्या तयारीसाठी धावाधाव सुरू झालेली दिसते.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News