निसर्गरम्य व भौतिक सुविधांनी परिपूर्ण अशी साने गुरुजींची शाळा

देवेंद्र दरेकर
Thursday, 5 March 2020

विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास होण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. त्यात नावीण्यपूर्व ज्ञान, विविध प्रयोग, खेळ, चर्चा, व अन्य उपक्रमांचा समावेश आहे.

लोहारमाळ - साने गुरुजी यांच्या विचाराने ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांना उत्तम दर्जेदार शिक्षण मिळावे, या महत्त्वाकांक्षी विचारातून ध्येयवेड्या सामाजिक कार्यकर्त्यांनी लोहारमाळ येथे आपल्या सहयोग प्रतिष्ठान संस्थेद्वारे सानेगुरुजी विद्यालयाची ११ जून २००९ रोजी स्थापना केली. या संस्थेने बांधलेल्या निसर्गरम्य अशी भौतिक सुविधांनी परिपूर्ण इमारतीमध्ये ज्ञानदानाचे उत्तम कार्य सुरळीतपणे पार पाडले जाते.

विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास होण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. त्यात नावीण्यपूर्व ज्ञान, विविध प्रयोग, खेळ, चर्चा, व अन्य उपक्रमांचा समावेश आहे. या सर्व प्रयत्नांमुळेच विद्यालयातील विद्यार्थी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये यश संपादन करत आहेत. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात २०१७-१८ या वर्षात प्रश्नमंजुषा स्पर्धेत सांची निकम, प्रज्ञा निकम यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तर २०१८-१९ मध्ये वक्तृत्व स्पर्धेत सांची निकम प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. अशा विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थी नावलौकिक मिळवत आहेत. बुद्धिमत्तेचा उपयोग करून श्रुती साळुंखे हिने २०१६-१७ मध्ये आणि सार्थक किशोर, समृद्धी निकम यांनी २०१८-१९ या वर्षात पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळवून शिष्यवृत्ती प्राप्त केली.

संस्थेच्या रौप्य महोत्सवी विद्यालयाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रथम बॅच प्रविष्ट होत आहे. या बॅचमध्ये एकूण १२ विद्यार्थी बसले आहेत. आपली ही पहिली बॅच १०० टक्के निकाल देऊन विद्यालयाच्या यशस्वी वाटचालीस आणखीन एक यश ठेवेल, असा आत्मविश्‍वास शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना आहे. भविष्यात सानेगुरुजी यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या या विद्यालयाचे संपूर्ण तालुक्‍यात एक उत्तम स्थान निर्माण होईल, याची परिपूर्ण खात्री आम्हाला आहे.

विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीच्या माध्यमातून आपल्या विद्यालयातील गुणी विद्यार्थी कौशल्य शिक्षणामधून उत्तम यश संपादन करतील. जेणेकरून एक उत्तम समाजप्रिय बांधिलकी जपणारा सानेगुरुजींच्या विचारांची जाण असणारा सुजाण नागरिक घडेल.

विद्यालयाचे नेतृत्व करताना सर्व कामे सुलभ होण्यासाठी सहयोगचे सर्व पदाधिकारी, सहकारी, पालक-विद्यार्थी, शाळा, सर्व समित्यांचे पदाधिकारी यांचे उत्तम सहकार्य आम्हाला मिळत आहे. त्यामुळे विद्यालयाची उत्तरोत्तर प्रगती होत आहे.

शेवटी मी एवढेच म्हणेन
निसर्गरम्य वातावरणातील ही स्वच्छ सुंदर शाळा,
शिकविते बाळा लावूनिया लळा !
या ज्ञान मंदिरात फुलवु मळा,
मिटवू अंधार काळा.
आताच आमच्या हातामध्ये कळस चढवण्याचे काम,
सशक्त पिढी घडवण्यासाठी गाळू थोडा घाम !!

सुगंधा वाढवळ, मुख्याध्यापक

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News