अशी करा तयारी हिमालयातील ट्रेकिंगची

हर्षदा कोतवाल
Wednesday, 12 February 2020
  • हिमालयातील मोठे ट्रेक एका दिवसात बरीच उंची गाठतात. त्यामुळंच हिमालयातील ट्रेक्‍समध्ये येणारी आव्हानं वेगळी आहेत आणि त्यांवर मात करण्यासाठी वेगळी तयारीही करावी लागते. 

हिमालयात ट्रेकिंग करणं हा स्वर्गाहून सुंदर अनुभव असतो. मात्र, आपल्या कमी तयारीमुळं हा अनुभव त्रासदायक होऊ नये, याची खबरदारी घ्यावी. हिमालयातील मोठे ट्रेक एका दिवसात बरीच उंची गाठतात. त्यामुळंच हिमालयातील ट्रेक्‍समध्ये येणारी आव्हानं वेगळी आहेत आणि त्यांवर मात करण्यासाठी वेगळी तयारीही करावी लागते. 

ही काळजी घ्या!

व्यायाम हवाच 

शारीरिक तंदुरुस्तीशिवाय हिमालयातले ट्रेक करता येत नाहीत. जास्त उंचीवर ऑक्‍सिजनची कमतरता असल्यानं फुप्फुसांवर ताण येतो. ट्रेकपूर्वी महिनाभर रोज पळण्याचा व्यायाम करा.

ॲक्‍लमटायझेशन इज मस्ट 

ट्रेकच्या बेस कॅम्पला पोचल्यावर अचानक खूप उंची गाठल्यानं त्रास होऊ शकतो. तिथल्या वातावरणात रुळण्यासाठी जवळपास थोडं फार वॉकिंग करा. 

थंडीपासून असा करा बचाव 

शरीरातील बरीच उष्णता डोक्‍यावाटे बाहेर पडते. त्यामुळे हिमालयात नेहमी तुमचं डोकं झाकून ठेवा. मात्र ट्रेकिंगला सुरुवात केल्यावर डोक्‍यात कानटोपी घालणं टाळा. 

तुमची औषधं सोबत हवीच 

ट्रेकला जाताना तुमची औषधं महत्त्वाची आहेत. ट्रेकदरम्यान छोट्या दुखापतीसुद्धा बळावू शकतात. मुलींनी सोबत नेहमी सॅनिटरी नॅपकिन ठेवावेत. ते डोंगरावरच टाकणे योग्य नाही.  

बॅग नीट भरा 

तुमची बॅग जेवढी हलकी, तेवढा ट्रेक सोपा हे साधं समीकरण आहे. तुम्ही उंचावर जाताना ऑक्‍सिजन कमी होतो. त्यामुळं बॅगेचं वजनही वाढल्यासारखं वाटतं.

हे करू नका! 

पाणी कमी पिणं

थंडीमुळं कमी पाणी पिणे. बर्फ आणि थंड वातावरणामुळं तहान कमी लागते. मात्र, पाणी कमी पिण्याची चूक करू नका. त्यानं तुम्ही डिहायड्रेट व्हाल आणि छातीत दुखणे, चक्कर येणे असे त्रास होतो.

वेगानं चालणं

आपण ट्रेकला आलोय, शर्यतीला नाही हे लक्षात ठेवा. ट्रेक लवकर संपविण्याच्या नादात वेगात चालू नका. एक श्‍वास-एक पाऊल, असं केल्यानं तुम्हाला थकवा जाणवणार नाही.

डोकेदुखीवर झोपेचा पर्याय चुकीचा 

ऑक्‍सिजनच्या कमतरतेमुळं हिमालयात डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. झोपेमुळे त्रास वाढू शकतो. त्यापेक्षा बाहेरच थांबून थोडंफार चालण्यानं त्रास कमी होतो. 

ड्रिंकिंग आणि स्मोकिंग नकोच!

 ट्रेकला गेल्यावर खूप थंडी आहे म्हणून चुकूनही मद्यपान करू नका. आधीच ऑक्‍सिजन कमी असल्यानं तुम्हाला श्‍वसनाचा त्रास होऊ शकतो. 

शरीराच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष 

एका मर्यादेनंतर तुम्हाला ट्रेक जमत नसल्यास शरीर इशारे देतं. उंची गाठताना छातीत दुखणे, श्‍वास घेता न येणे, डोळ्यावर अंधारी येणे, रक्ताच्या उलट्या होणे असे त्रास झाल्यास त्वरित कमी उंचीवर यावं. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News