तरुणांमध्ये व्यक्तिमत्त्व विकास गरजेचे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 1 February 2020

स्पर्धेचे जग आहे, असे अधोरेखित करतानाच तायडे म्हणाले, स्पर्धा कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. नेहमी स्पर्धा आहे, असेच ऐकायला मिळते. पण स्पर्धेबरोबरच हे देखील लक्षात ठेवा की, जग जितके स्पर्धेचे तितकेच सादरीकरणाचे देखील आहे.

नवी मुंबई : कुठलीही भाषा उत्तम यायला हवी. तिच्यावर प्रभुत्व असायला हवे, असे वाटते. तेव्हा ती भाषा जगायला शिकायला हवी. कोणतीही गोष्ट ‘दिल से’ शिका, असा कानमंत्र वक्ते सचिन तायडे यांनी विद्यार्थ्यांना दिला. नेरूळ येथे गुरुवारी ‘यिन संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी व्यक्तिमत्त्व विकास विषयावर ते बोलत होते. स्टर्लिंग इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या या कार्यक्रमास अंकित जैन, इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. प्रशांत गुंडावार, डॉ. फोंडे, सकाळ यिनप्रमुख तेजस गुजराथी आदी उपस्थित होते. 

या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सचिन तायडे म्हणाले की, व्यक्तिमत्त्व विकास म्हटला, की आपण फक्त बाह्यव्यक्तिमत्त्वाला महत्त्व देतो. जेव्हा आपण आपल्या क्षमतांचा विकास करू लागतो, तेव्हा खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्त्व विकासाला सुरुवात होते. दुसऱ्याचे अनुकरण करून व्यक्तिमत्त्व विकास होत नाही. चांगले कपडे किंवा तुमचे दिसणे यापलीकडे जाऊन स्वतःवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. 

स्पर्धेचे जग आहे, असे अधोरेखित करतानाच तायडे म्हणाले, स्पर्धा कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. नेहमी स्पर्धा आहे, असेच ऐकायला मिळते. पण स्पर्धेबरोबरच हे देखील लक्षात ठेवा की, जग जितके स्पर्धेचे तितकेच सादरीकरणाचे देखील आहे. त्यामुळे केवळ दिखाव्याला महत्त्व आले आहे. परंतु व्यक्तिमत्त्व विकास हा कालमर्यादित नव्हे; तर पूर्ण वेळ असायला हवा. माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम, शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या जीवनातील प्रसंगांची उदाहरणे देत विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे कष्ट, मेहनत घेण्याचा कानमंत्र त्यांनी दिला. 

व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे नेमके काय?

कार्यक्रमादरम्यान वक्ते अंकित जैन यांनी व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे नेमके काय? त्याकरिता कोणत्या साध्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे, यावर मार्गदर्शन केले. त्याकरिता भारतीय फुटबॉल टीमचा कप्तान सुनील छेत्री याची मार्गदर्शनपर चलत्‌ चित्रफीतही दाखवण्यात आली. व्यक्तिमत्त्व विकासामध्ये दिसणे/पेहराव, देहबोली आणि संवादशैली महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News