जागतिक महिला दिनानिमित्त 'निर्भया मॅरेथॅानचे' आयोजन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 4 March 2020

पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्यासह सेवाभावी संस्था आणि महाविद्यालयीन युवक-युवतींनी यात सहभाग नोंदविला.

नाशिक  : येत्या रविवारी  जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण व सबलीकरणाचा संदेश देण्यासाठी पोलिस आयुक्तालयातर्फे ‘निर्भया मॅरेथॉन’ होणार आहे. या मॅरेथॉनच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी पहाटे घेण्यात आलेल्या प्रोमो रनमध्ये शेकडो नाशिककर सहभागी होत धावले. 

पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्यासह सेवाभावी संस्था आणि महाविद्यालयीन युवक-युवतींनी यात सहभाग नोंदविला. ठक्कर डोम येथे मंगळवारी पहाटे प्रोमो रनचे आयोजन करण्यात आले होते. या प्रोमो रनला पोलिस आयुक्त नांगरे-पाटील, उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी, सायकलिस्ट असोसिएशनच्या डॉ. मनीषा रौंदळ, इस्पॅलियर स्कूलच्या मुलींनी हिरवा झेंडा दाखविला. ‘एक धाव स्वत:साठी, एक धाव महिला सुरक्षिततेसाठी’ असे या मॅरेथॉनचे घोषवाक्‍य आहे. येत्या रविवारी ३, ५, १०, २१ किलोमीटरच्या गटात मॅरेथॉनची स्पर्धा होत असून, या मॅरेथॉनमध्ये १५ हजारांहून अधिक नाशिककरांनी नावनोंदणी केली आहे. यात महिलांचा सहभाग सर्वाधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

दरम्यान, ठक्कर डोम येथून प्रोमो रनला मंगळवारी सकाळी साडेसातला प्रारंभ झाला. त्यानंतर प्रोमो रन, एबीबी सर्कल, पंचवटी इलाइट सिग्नल, शरणपूर रोड सिग्नल या मार्गावरून धावपटू ठक्कर डोम येथे पोचले. या रनसाठी बदलापूर येथील सायकलिस्ट स्मिता मंडकमाळवी याही सहभागी झाल्या होत्या. यात सायकलिस्ट असोसिएशनसह वेगवेगळ्या संस्था, संघटनांचे पदाधिकारीही सहभागी 
झाले होते.

टॉक शोमध्ये साधता येणार संवाद

येत्या रविवारी मॅरेथॉनसाठी अभिनेत्री जान्हवी कपूर, ‘सैराट’फेम रिंकू राजगुरू, संयमी खेर, अभिनेता स्वप्नील जोशी, जितेंद्र जोशी, क्रिकेटपटू अजिंक्‍य रहाणे उपस्थित राहणार आहेत. ठक्कर डोम येथे होणाऱ्या टॉक-शोमध्ये हे कलावंत सहभागी होणार आहेत. 

या वेळी उपस्थित महिलांना त्यांच्याशी थेट संवाद साधता येणार आहे. दरम्यान, महिला सुरक्षिततेसंदर्भात उपाय शहर पोलिस नियंत्रण कक्षाच्या ८३९०२०९५१८ या व्हॉट्‌सॲप क्रमांकावर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महिलांच्या समस्यांबाबत सामाजिक जाणिवेतून विचारलेले दोन प्रश्‍न आणि सुचविलेल्या उपायांना विशेष पारितोषिकही मान्यवरांच्या हस्ते दिले जाणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News