हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजीमध्ये तरुणांना करिअरची संधी

श्‍याम जाधव
Monday, 2 March 2020

मानवी राहणीमानाचा दर्जा व शैली दिवसेंदिवस विकसित होत असल्याने हॉटेल मॅनेजमेंट व्यवसायाला सुगीचे दिवस प्राप्त झाले आहेत.

हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलाजी हा कोर्स पूर्ण करून चांगल्या दर्जाची नोकरी आणि उत्तम पगार मिळण्यासाठी आता पूर्वीसारखे पुणे, मुंबई किंवा परराज्यात जाण्याची गरज राहिलेली नाही. तिथे न जाताही मराठवाड्यातील केवळ नांदेडमध्ये विष्णुपुरी येथील ग्रामीण तंत्रनिकेतन या संस्थेत ‘एआयसीटीइ’ मान्यताप्राप्त हा अभ्यासक्रम सुरू झाला आहे. बीएचएमसीटी हा अभ्यासक्रम स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित असून यासाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा, दर्जेदार प्रशिक्षण देण्याचे काम संस्था प्राचार्य डॉ. विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे.

सर्व शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना हॉटेल व पर्यटन उद्योगात करिअरची सुवर्ण संधी या ठिकाणी उपलब्ध झाली आहे. अनेक विद्यार्थ्यांचा बीएचएमसीटी म्हणजे वेटरची नोकरी असा गैरसमज झालेला आहे. वास्तविक बीएचएमसीटी या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद मान्यताप्राप्त चार वर्षांच्या अभ्यासक्रमानंतर शंभर टक्के चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. ३० हजारांपेक्षा अधिक मासिक पगाराची शाश्वती देणारा हा अभ्यासक्रम इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या तुलनेने सोपादेखील आहे. थेअरीपेक्षा प्रात्यक्षिकांवर अधिक भर देत खान-पान, पर्यटन, पाककलेची आवड असणाऱ्या तरुणांना अल्पावधीतच करिअर घडविण्याची संधी हा अभ्यासक्रम देतो.

मानवी राहणीमानाचा दर्जा व शैली दिवसेंदिवस विकसित होत असल्याने हॉटेल मॅनेजमेंट व्यवसायाला सुगीचे दिवस प्राप्त झाले आहेत. पंचतारांकित हॉटेल उद्योग ते पर्यटन क्षेत्र, बेकरी प्रोडक्ट्स, अनेक क्षेत्रीय पदार्थांना वैश्विक बाजारपेठेत आणणाऱ्या अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या, पॅकेड प्रोडक्ट्स आणि  हजारो कोटींची उलाढाल असलेल्या डेअरी इंडस्ट्रीत कुशल मनुष्यबळ पुरविणारा हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम आज तरुणांना करिअर संधीचे अगणित विश्व खुले करून देत आहे. 

अशा आहेत नोकरीच्या संधी 

हॉटेल व्यवस्थापनात कूक, असिस्टंट मॅनेजर, हाऊसकिपिंग मॅनेजर, रेस्टॉरंट व किचन सुपरवायझर, फ्रंट ऑफिस मॅनेजर, एअरलाईन्स, फूड सर्विस प्रोवाइडर, कार्पोरेट कॅटिंन मॅनेजर, मॉल्स, रेल्वे व शिपिंगमध्ये किचन कॅन्सल्टंट, फास्टफूड क्षेत्रात नोकरीची अनेक दालने भारतात व परदेशात उपलब्ध आहेत. अनेक शासन अंगिकृत संस्था, महाराष्ट्र टूरिझम डेव्हलपमेंट कार्पोरेशन व इंडियन टूरिझम डेव्हलपमेंट कार्पोरेशन या आस्थापनातही मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. या शिवाय हा अभ्यासक्रम पूर्ण करून स्वयंरोजगार उभारल्यास अल्पावधीतच लाखोंची कमाईदेखील करता येते. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना परदेशातही प्रचंड मागणी आहे.

कुठे चालतो हा अभ्यासक्रम?

सबंध मराठवाड्यात एआयसीटीई मान्यताप्राप्त बीएचएमसीटी हा अभ्यासक्रम केवळ ग्रामीण तंत्रनिकेतन, विष्णुपुरी नांदेड या संस्थेत राबविला जातो. हा अभ्यासक्रम स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित असून अभ्यासक्रमासाठी आवश्यक सर्व पायाभूत सुविधा, दर्जेदार प्रशिक्षण देणारी ही संस्था आहे. या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देता यावे यासाठी संस्थेने स्वतंत्र दालनच निर्माण केले आहे.

पात्रता परीक्षेचे स्वरूप कसे आहे ?

या अभ्यासक्रमात प्रवेशासाठी कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी अशा कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थी पात्र ठरतो. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी MAH-BHMCT-CET २०२० ही प्रवेशपूर्व पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असते. २०२०-२१ करिता प्रवेश पूर्व परीक्षा दहा मे रोजी होणार असून त्याकरिता दोन मार्च ते ३१ मार्चदरम्यान ऑनलाइन प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार आहेत. पात्रता परीक्षेकरता अर्ज करण्यासाठी https://info.mahacet.org/cet2020/BHMCT2020/ या संकेतस्थळावर भेट द्यावी.

काय आहे पात्रता परीक्षेचा अभ्यासक्रम 

बीएचएमसीटी प्रवेशासाठी प्रतिवर्षी १०० गुणांची कॉमन एंट्रन्स टेस्ट घेतली जाते. ती इंग्रजी माध्यमातून वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित असते. प्रत्येक प्रश्नास एक गुण असतो, तर चुकीच्या उत्तरास मायनस पद्धतीने गुण कमी केले जातात. इंग्रजी व्याकरण व विषयावर आधारित ४० गुण, सामान्य ज्ञानास अनुसरून ३० गुण, तर बुद्धिमत्तेवर आधारित ३० गुण, असे १०० गुणांचे वर्गीकरण या परीक्षेत असते. 

मोफत प्रशिक्षण कुठे मिळेल ?

या अभ्यासक्रमाच्या पूर्व परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी, परीक्षा पद्धती समजावून सांगण्यासाठी पूर्व परीक्षेचे १५ दिवसांचे प्रशिक्षण संस्थेतर्फे आयोजन करण्यात येत असल्याचे प्राचार्य डॉ. विजय पवार यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपले उज्ज्वल भवितव्य घडवावे व अधिक माहितीसाठी विभागप्रमुख सौ. गायत्री पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ग्रामीण तंत्रनिकेतन, विष्णुपुरी नांदेडचे प्राचार्य डॉ. विजय पवार यांनी केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News