आता शासनाकडून ४८७५ विद्यार्थ्यांना मिळणार वाहतूक सुविधा

संतोष सिरसट
Monday, 24 February 2020

पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक किलोमीटर परिसरात शाळा उपलब्ध असणे गरजेचे आहे. तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन किलोमीटरच्या परिसरात शाळा उपलब्ध असायला हवी असे बालकांचा मोफत व सक्‍तीच्या शिक्षणाचा अधिकार हा कायदा सांगतो.

सोलापूर : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारान्वये राज्यातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पहिली ते पाचवी व सहावी ते आठवीच्या चार हजार ८७५ विद्यार्थ्यांना शाळेला जाण्यासाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे विद्यार्थी ९१७ वस्त्यांवरील आहेत.

राज्यात शाळा पटसंख्येअभावी बंद पडू लागल्या आहेत. अनेक शाळांमध्ये विद्यार्थी दोन तर शिक्षक तीन अशी स्थिती आहे. त्यामुळे कमी पटाच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. हा निर्णय घेताना त्या शाळेतील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत जाण्यासाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. त्यानुसार शासनाने आता त्यासाठीच्या वस्त्या निश्‍चित केल्या आहेत. त्याचबरोबर पहिली ते आठवीचे किती विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे हेही निश्‍चित केले आहे.

पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक किलोमीटर परिसरात शाळा उपलब्ध असणे गरजेचे आहे. तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन किलोमीटरच्या परिसरात शाळा उपलब्ध असायला हवी असे बालकांचा मोफत व सक्‍तीच्या शिक्षणाचा अधिकार हा कायदा सांगतो. त्यानुसार शासनाने प्रत्येक जिल्ह्यातील तालुका व त्या तालुक्‍यामध्ये असलेल्या केंद्रातील किती विद्यार्थ्यांना एक व तीन किलोमीटरच्या परिसरात शाळेची सोय उपलब्ध नाही अशा विद्यार्थ्यांची संख्या निश्‍चित केली आहे.

शासनाने निश्‍चित केलेल्या संख्येनुसार राज्यात चार हजार ८७५ विद्यार्थ्यांना एक व तीन किलोमीटर परिसरात शाळा उपलब्ध नाही. त्या विद्यार्थ्यांना आता वाहतूक सुविधा पुरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर एखाद्या ठिकाणी शाळा उपलब्ध असूनही त्याठिकाणी पाचवी किंवा आठवीचा वर्ग उपलब्ध नसल्याने त्या विद्यार्थ्यांनाही वाहतूक सुविधा दिली जाणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News