आता पर्यटनातून होणार गावाचा विकास

दत्ता म्हसकर
Monday, 2 March 2020

वनविभागाच्या विविध उपक्रमांना स्थानिक ग्रामस्थांनी साथ दिली. त्यातून नाणेघाटाची जबाबदार पर्यटनाकडे वाटचाल सुरू आहे.

जुन्नर : ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्या निधीतून परिसरातील वनाचा व गावाचा विकास करण्याचे ध्येय ठेवले आहे. 

जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून जाहीर झाला आहे. नाणेघाटातील मुक्त पर्यटनाला आळा घालण्याचे काम स्थानिक ग्रामस्थ संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून करत आहे. वनविभागाच्या विविध उपक्रमांना स्थानिक ग्रामस्थांनी साथ दिली. त्यातून नाणेघाटाची जबाबदार पर्यटनाकडे वाटचाल सुरू आहे.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून पुणे वनवृत्तचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांचे संकल्पनेतून व संयुक्त वन व्यवस्थापन समिती घाटघरच्या माध्यमातून नाणेघाट येथे वन विभागाने जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथील तंबू व अन्य सुविधांसाठी सुमारे तीस लाख रुपयांचा निधी खर्च केला आहे. यातून मिळणाऱ्या उत्पन्नात येथील पाच ते सहा युवकांच्या रोजगाराचा खर्च वजा जाता उर्वरित रकमेतून देखभाल व दुरुस्ती करण्यात येणार आहे. या परिसरातील तांदूळ, रानभाज्या, फळे आदी विक्रीतून आणि खाद्यपदार्थ व अन्य सेवामधून स्थानिकांना आर्थिक लाभ होणार आहे. नाणेघाट परिसरात पावसाळ्याच्या चार महिन्यांत पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात.

परिसरातील जीवधन, हडसर, चावंड येथे गिर्यारोहणासाठी वर्षभर गिर्यारोहक येत असतात. नाणेघाटातील शिलालेख, दगडी रांजण, नानाचा अंगठा, उफराटा धबधबा, पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य, उन्हाळ्यातील गारवा पर्यटकांना आकर्षित करतो. मात्र, प्रत्यक्ष नाणेघाटात कोठेच मुक्कामी राहता येत नाही. मात्र, आता जंगल कॅम्प हाउसच्या माध्यमातून त्यांच्या निवासाची हक्काची सोय झाली आहे. तसेच, यातून परिसरातील रोजगाराच्या संधीत वाढ होणार आहे. परिसरातील हॉटेल व्यवसायात वृद्धी होण्यास मदत होणार आहे.

पर्यटनाला योग्य दिशा

नाणेघाटात येणाऱ्या पर्यटकांवर कोणाचे निर्बंध नव्हते. अनेकजण केवळ मद्यप्राशन व मौजमजा करण्यासाठी येत असत. या पर्यटकांचा स्थानिक ग्रामस्थांना मोठा त्रास होत असे. यावर मात करण्यासाठी येथे सुरू केलेल्या उपद्रव शुल्क नाका सुरू केला. त्यामुळे मद्यपान करणाऱ्यांना आळा बसला. युवकांचा धांगडधिंगा थांबला. त्यातून महिला व अन्य पर्यटकांची संख्या वाढली.

स्थानिक ग्रामस्थांची लहान- मोठी हॉटेल व खाद्यपदार्थ विक्रीच्या हातगाड्यांमुळे अप्रत्यक्षपणे गावातील ग्रामस्थांना आर्थिक फायदा होऊ लागला. बेशिस्त पर्यटनाला शिस्त लागली. रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. परिसरात स्वच्छता राखली जाऊ लागली. त्यातून जबाबदार पर्यटनाकडे वाटचाल सुरू झाली आहे. विवेक खांडेकर यांच्यासह उपवनसंरक्षक जयरामे गौडा, वनक्षेत्रपाल अजित शिंदे यांच्या संकल्पनेतून व संयुक्त वन व्यवस्थापन समिती, घाटघर ग्रामस्थ यांच्या माध्यमातून येथील पर्यटनाला एक वेगळी दिशा लाभत आहे. 

जंगल कॅम्प हाउसची वैशिष्ट्ये

  • एकूण पाच कापडी तंबूची उभारणी. एका तंबूमध्ये चार बेड 
  • स्वच्छतागृह, पाणी व वीज व्यवस्था   
  • एका तंबूचे भाडे एक रात्रीसाठी दोन हजार रुपये
  • सर्व तंबूभोवती तारेच्या कुंपणाचे संरक्षण
  • रानमेवा, तांदूळ व रानभाज्या विक्रीची व्यवस्था 
  • परिसरातील हॉटेल व्यवसायात वृद्धी होण्यास मदत 
  • निवासाची हक्काची सोय
     

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News