यशस्वी होण्यासाठी तरुणाईला प्रेरणा देणाऱ्या स्पर्धांची आवश्यकता

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 February 2020

बदलत्या युगात सुगम संगीत, गायन पद्‌धतीकडे युवाईचा दुर्लक्ष होत आहे; मात्र काही युवकांचा ओढा आजही शास्त्रीय गायनाकडे आहे.

सावंतवाडी : सुगम संगीत, नाट्य, गीत गायनाची आवड निर्माण व्हावी म्हणून सैनिक नागरी सहकारी पतसंस्था आयोजित स्पर्धेमुळे तरुणाईला प्रेरणा मिळेल, असा विश्‍वास नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केला. येथील पर्यटन महोत्सवात देखील या गायनाला प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून जनरल जगन्नाथराव भोसले बालोद्यानमध्ये आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय संगीत स्पर्धेचे उद्‌घाटन श्री. परब यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. मला यशस्वी उद्योजक होण्यासाठी तत्कालीन परिस्थितीत सैनिक बॅंकेने मोलाचे सहकार्य केले. आयुष्यातील पहिले दुचाकीसाठी काढलेले दहा हजार रुपये कर्ज त्यांनीच मला दिले. त्यामुळे पुढे मी यशस्वी होऊ शकलो. सैनिक बॅंकेची प्रगती उत्तरोत्तर होत राहो. त्यासाठी आवश्‍यक असलेले सहकार्य मी नक्कीच करेन, असा विश्‍वास नगराध्यक्ष परब यांनी येथे व्यक्त केला. जिल्हास्तरीय गायन स्पर्धेच्या माध्यमातून कलाकार घडविण्याचे चांगले काम पतसंस्थेचे पदाधिकारी करीत आहेत. या स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या स्पर्धकांना येथील महोत्सवात संधी देण्यात येईल, असेही परब यांनी सांगितले.

संस्थेचे चेअरमन शिवराम जोशी, व्हाईस चेअरमन हिंदबाळ केळुसकर, संस्थापक माजी अध्यक्ष पी. एफ. डॉन्टस, उपनगराध्यक्ष अन्नपुर्णा कोरगावकर, दीपाली भालेकर, राजू बेग, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा कार्यकारी संचालक सुनिल राऊळ, बाबूराव कविटकर, ललिता भोळे, माधव गावकर, संजय धुपकर उपस्थित होते. येथील सैनिक पतसंस्थेच्या वतीने रथसप्तमी निमित्त आयोजित जिल्हास्तरीय सुगम संगीत गायन स्पर्धेसाठी प्राथमिक फेरीतील निवड २७ स्पर्धकांना सहभाग दिला होता. याची सुरुवात येथील ओंकार कला मंचच्या नृत्य कलाकारांनी गणेश वंदनेने केली.

याप्रसंगी श्री. डॉन्टस म्हणाले, ‘‘बदलत्या युगात सुगम संगीत, गायन पद्‌धतीकडे युवाईचा दुर्लक्ष होत आहे; मात्र काही युवकांचा ओढा आजही शास्त्रीय गायनाकडे आहे. अशा युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी सैनिक पतसंस्थेच्या माध्यमातून माझी सैनिकांकडून हे छोटेखानी प्रयत्न आहेत.’’ दोन दिवस होणाऱ्या सुगम संगीत व नाट्यसंगीत स्पर्धेचा स्पर्धकांनी व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मुख्य कार्यकारी अधिकारी तथा कार्यकारी संचालक सुनील राऊळ यांनी प्रास्ताविक  केले. आभार बाबुराव कविटकर यांनी मानले. सुत्रसंचालन एस. के. गावडे यांनी केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News