नौदलाच्या तरूणाने जनजागृतीसाठी केला 'हा' अनोखा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 5 March 2020

विशाखापट्टणम्‌पासून मुंबई असा एकदातरी सायकल प्रवास करण्याचा निर्णय त्याने घेतला होता. या दरम्यान समुद्रकिनारपट्टी प्रदूषणापासून वाचवण्यासाठी लोकांमध्ये प्रबोधन करण्याचा निर्णय घेतला.

नेरळ : समुद्रकिनारा प्रदूषणमुक्तीची नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी कर्जत तालुक्‍यातील वारे गावातील मूळचा रहिवासी असलेल्या अक्षय हरिचंद्र म्हसे या नौदलामध्ये कार्यरत तरुणाने विशाखापट्टणम्‌ ते कर्जत असा तब्बल १६६६ किलोमीटरचा सायकल प्रवास केला. अक्षयने आपल्या विशाखापट्टणम्‌ येथील कार्यालयातून मुंबई म्हणजे पूर्व किनारपट्टी ते पश्‍चिम किनारपट्टी असा सायकलने प्रवास करण्याचा निर्णय घेऊन कर्जतमधून आता मुंबईत पोहचला.

२०१५ मध्ये अक्षय नौदलामध्ये रुजू झाला. त्यानंतर पाच वर्षे विशाखापट्टणम्‌ येथील तळावर अक्षय सेवा बजावत होता. २०२० मध्ये नेव्हीच्या मुंबई येथील मुख्यालयात बदली झाली. त्यामुळे काहीतरी वेगळ्या पद्धतीने गेले पाहिजे असा विचार अक्षय याने आपल्या मामाकडे व्यक्त केला. विशाखापट्टणम्‌पासून मुंबई असा एकदातरी सायकल प्रवास करण्याचा निर्णय त्याने घेतला होता. या दरम्यान समुद्रकिनारपट्टी प्रदूषणापासून वाचवण्यासाठी लोकांमध्ये प्रबोधन करण्याचा निर्णय घेतला.

त्यासाठी विशाखापट्टण ते मुंबई असा प्रवास करण्याचा कार्यक्रम निश्‍चित केला. त्यानंतर अक्षयने २१ फेब्रुवारीला विशाखापट्टणम येथून सायकलवरून कर्जत आणि कर्जत येथून मुंबई जाण्याचा प्रवास सुरू केला. या वेळी त्याने नागरिकांशी संवाद साधत किनारपट्‌टी प्रदूषणमुक्त करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

११ दिवसांत तब्बल १६६६ किलोमीटर प्रवास सायकलवरून पार करून अक्षय आधी आपल्या कर्जतच्या घरी आणि नंतर आपल्या नवीन कार्यालय असलेल्या नेव्ही डॉकयार्ड येथील कार्यालयात पोहचला आहे. मोहिमेनंतर अक्षयने कर्जत गाठले. कर्जतकरांनी मोठ्या संख्येने त्याच्या आनंदात सहभाग नोंदवत ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News