बीएसस्सी नर्सिंग महाविद्यालयात सुरू होणार एमएस्सी नर्सिंग अभ्यासक्रम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 February 2020

मेडिकलशी संलग्न बीएसस्सी नर्सिंग महाविद्यालयात २००६ पासून कार्यरत ट्यूटरच्या समस्या अद्याप सोडवण्यात आलेल्या नाहीत.

नागपूर : मेडिकलशी संलग्न बीएसस्सी नर्सिंग महाविद्यालयात २००६ पासून कार्यरत ट्यूटरच्या समस्या अद्याप सोडवण्यात आलेल्या नाहीत. त्यांच्या समस्यांवर चर्चा करून येत्या सत्रापासून एमएस्सी नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्याशी चर्चा करण्यात आली. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या उपस्थितीत बीएसस्सी नर्सिंगचे प्राचार्य प्रा. भारत मुनेश्‍वर, ग्रॅज्युऐट नर्सिंग संघटनेचे सचिव प्रा. प्रकाश मकासरे यांनी याविषयी माहिती दिली.  

याशिवाय सुपर स्पेशालिटी, मेडिकलमध्ये विविध समस्या यावेळी डॉ. चंदनवाले यांनी जाणून घेतल्या. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथील एक वार्ड अद्यापही जीर्ण इमारतीमध्ये सुरू आहे. त्यामुळे येथील रुग्णांचा जीव टांगणीला आला आहे. मेडिकलमध्ये बैठक घेण्यापुर्वी डॉ. चंदनवाले यांनी मेयो रुग्णालयात भेट दिली. मेडिकलमध्ये त्वचारोग विभागात सज्जा पडून दोघांचा मृत्यू झाला होता. या पार्श्‍वभूमीवर मेडिकलसह मेयो, डागा रुग्णालयात रुग्णालयातील जिर्ण इमारतींचे स्ट्रक्‍चरल ऑडिट सुरू आहे. मेयोतील पाच वॉर्डांची अवस्था वाईट असल्याचा अहवाल पुढे आल्यानंतर हे वॉर्ड इतरत्र हलवण्याची सोय नव्हती. यामुळे जीर्ण इमारतीतच उपचार सुरू होते. मेडिकलमधील त्वचारोग विभागातील सज्जा पडून दोन जीव गेल्यानंतर मात्र मेयो प्रशासनाला जाग आली व तातडीने वॉर्ड हलवण्यास सुरूवात केली. 

वॉर्ड क्रमांक ७,८ व ४  हे वॉर्ड हलवण्यात आले. परंतु वार्ड क्रमांक ३ अद्याप बदलण्यात आला नाही. बालरोग विभागाच्या अखत्यारित असलेल्या हा वॉर्ड जीर्ण वॉर्डाच्या तुलनेत बरा आहे. असा दावा मेयो प्रशासनाकडून वैद्यकीय सहसंचालक डॉ. चंदनवाले यांच्यासमोर करण्यात आला. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनच दिली गेल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, काही बरेवाईट झाल्यास जबाबदार कोण असा सवाल पुढे येताच साऱ्यांनी चुप्पी साधली. या वार्डास लवकरच हलवण्याची प्रशासनाची तयारी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गुरूवारी घेण्यात आलेल्या मेयो-मेडिकलमधील बैठकींचा अहवाल मुंबईत वैद्यकीय शिक्षण खात्याकडे सादर करणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News