मृणमयी दिग्दर्शित 'मन फकिरा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 February 2020

‘सकाळ’च्या ‘कॉफी विथ सकाळ’ या उपक्रमात ‘मन फकिरा’ चित्रपटाच्या दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे, अभिनेत्री सायली संजीव आणि अंकित मोहन सहभागी झाले होते. त्यांनी ‘मन फकिरा’बाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.

मराठी चित्रपटांमध्ये नावीन्य येत आहे असे अनेकदा म्हटले जाते. तसाच एक ‘मन फकिरा’ हा चित्रपट ६ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याचे दिग्दर्शन अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांनी केले आहे. चित्रपटात सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील, अंकित मोहन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘सकाळ’च्या ‘कॉफी विथ सकाळ’ या उपक्रमात ‘मन फकिरा’ चित्रपटाच्या दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे, अभिनेत्री सायली संजीव आणि अंकित मोहन सहभागी झाले होते. त्यांनी ‘मन फकिरा’बाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.

‘मन फकिरा’ चित्रपटाचा विषय कसा सुचला?

मृण्मयी- सध्याच्या बदलणाऱ्या पिढीचे विषय वेगळे आहेत, त्यांचे प्रश्‍न वेगळे आहेत. पारंपरिक पद्धतीने लग्न केल्यानंतरही काही जुन्या नात्यांविषयी असलेले किंतु-परंतु त्यांच्या मनात असतात. या विचारातून हा विषय सुचला. हा चित्रपट नुकतेच लग्न झालेल्या जोडप्याचा आहे. त्यात दोन्हींच्या आयुष्यात याआधी कोणी तरी व्यक्ती असते. त्या व्यक्तीशी त्यांचे चांगले नाते असते. परंतु पारंपरिक लग्नानंतर त्यांचा आधीच्या नात्याचा प्रश्‍न सुटलेला नसतो. अशा अडचणी सध्याच्या पिढीसमोर येत आहेत, परंतु त्यातही सगळ्या नात्यांची जपणूक करीत प्रश्‍न कसे सोडवायचे याचे उत्तम चित्रीकरण या चित्रपटात करण्यात आले आहे.

दिग्दर्शन करण्याचा हा तुमचा पहिला प्रयत्न होता. त्यामुळे ‘स्त्री’ म्हणून कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागले?

मृण्मयी- दिग्दर्शनाचा माझा हा पहिलाच अनुभव असल्याने खूप आव्हानांना सामोरे गेले. त्यात आपल्या वातावरणात पुरुषप्रधान संस्कृती ही अनेक वेळा कळत नकळत ठसठशीत होते,सर्वच क्षेत्रामध्ये पुरुषप्रधान संस्कृती आहे, ती इथे पण आहे. त्यामुळे माझ्यासाठी ते आव्हानात्मक होते. आणि ते आव्हान मी पेलले. कोणतेही महत्त्वाचे निर्णय आजही घरांमध्ये पुरुषमंडळीच घेतात. यावरून ही संस्कृती जास्त गडद झालेली दिसते. तोच अनुभव चित्रपटाचे दिग्दर्शन करतानाही आला, परंतु जबाबदारीने आणि पालकांनी घालून दिलेल्या शिस्तीमुळे मला हे आव्हान परतवून लावता आले. तसेच महाविद्यालयात असताना ‘पोपटी चौकट’सारखी अनेक नाटके केली. त्यांचा अनुभव पाठीशी होता. त्यामुळे या कामाचा पाया रचला गेला असे म्हणता येईल.

हिंगणघाटसारखे प्रकार पुन्हा पुन्हा का घडतात? 

हिंगणघाटची घटना खूपच वेदनादायी आहे. पुरुषसत्ताक पद्धतीमुळेच असे प्रकार होतात. तसेच स्त्रियांची वागणूकही त्याला पोषक असते. त्यामुळे यात बदल होण्यासाठी मोठा कालावधी जावा लागणार आहे.

चित्रपटाची संहिता का आवडली?

सायली- सध्याच्या व्यवहारी होत जाणाऱ्या तरुणाईमध्ये अनेक प्रश्‍न जुन्या-नव्या नात्यांबद्दल निर्माण होतात. तरीसुद्धा सर्व नाती जपून आनंदाने जगता येते, असे सुंदर कथानक असलेला हा चित्रपट आहे. असा विषय मी यापूर्वी वाचला नव्हता. त्यामुळे नेहमीच्या विषयांपेक्षा नक्कीच हे नवे असल्याने मी लगेचच चित्रपट स्वीकारला.

चित्रपट करताना तुमच्यासाठी कोणते आव्हान होते?

अंकित - ऐतिहासिक भूमिका करत असल्यामुळे प्रेक्षकांसाठी मी नव्या भूमिकेत येणार आहे. मी हिंदी भाषिक आहे. मराठी भाषेचा अभ्यास करताना खूप आनंद वाटला. मराठी प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले आहे. ‘मन फकिरा’ देखिल प्रेक्षकांना तितकाच आवडेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News