मॅंचेस्टरने रेयाल माद्रिदला चारली पराभवाची धूळ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 February 2020

सामन्याची चुरस वाढलेली असताना आणि रेयाल माद्रिदकडून शर्थीचे प्रयत्न केले जात असताना त्यांचा कर्णधार रामोसला रेड कार्ड दाखवून बाहेर काढण्यात आले.

माद्रिद : गॅब्रियल जिजस आणि केविन डि ब्रुईन यांनी अखेरच्या १२ मिनिटांत केलेल्या गोलांच्या जोरावर मॅंचेस्टर सिटीने बाजी पलटवली आणि चॅम्पियन्स लीगमध्ये उपउपांत्यपूर्व सामन्यात पहिल्या टप्प्यात रेयाल माद्रिदचा २-१ असा पराभव केला.

पहिल्या अर्धातील संघर्षानंतर यजमान रेयाल माद्रिदने सिटीच्या रोद्री आणि निकोलस ऑटमेंदी यांच्यात झालेल्या चुकीचा फायदा घेत पहिला गोल केला. विनिसिअस ज्युनियरने दिलेल्या पासवर इस्कोने ६० व्या मिनिटाला हा गोल केला. त्यानंतर सेरगी रामोसचा फटका बाहेर गेल्यामुळे रेयाल माद्रिदला २-० आघाडी घेता आली नाही; परंतु १२ मिनिटांनंतर जिजसच्या गोलामुळे मॅंचेस्टर सिटीने १-१ बरोबरी साधली.

या गोलामुळे आत्मविश्‍वास वाढलेल्या सिटीच्या खेळाडूंचा खेळ बहरला. सात मिनिटांनंतर राखीव खेळाडू रहीम स्टर्लिंगला गोलपोस्टमध्ये पाडण्यात आले. परिणामी मिळालेल्या पेनल्टी कीकचे डी ब्रुईनने सोने केले. सामन्याची चुरस वाढलेली असताना आणि रेयाल माद्रिदकडून शर्थीचे प्रयत्न केले जात असताना त्यांचा कर्णधार रामोसला रेड कार्ड दाखवून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे सामन्याची अखेरची पाच मिनिटे शिल्लक होती. जिजसला खाली पाडण्याचा प्रयत्न त्याच्या अंगलट आला.

चॅम्पियन्स लीगमध्ये मॅंचेस्टर सिटीने रेयाल माद्रिदवर पहिल्यांदा विजय मिळवला आहे. दोन अवे गोल केल्यामुळे सिटीला आता घरच्या मैदानावर होणाऱ्या दुसऱ्या टप्प्याच्या सामन्यात वर्चस्व मिळणार आहे. हा सामना १७ मार्चला होत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News