कॅापीविरहीत परीक्षा पार पडावी यासाठी भरारी पथके तैनात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 February 2020

परीक्षा सुरू असताना कोणालाही मोबाईल वापरण्यास बंदी आहे. परीक्षा केंद्रामध्येही मोबाईलच्या प्रवेशास निर्बंध घालण्यात आले आहेत. 

नेरळ : उच्च माध्यमिक मंडळाची म्हणजे बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. या परीक्षेसाठी कर्जत तालुक्‍यात तीन केंद्र ठेवण्यात आले असून, त्या केंद्रांवर २ हजार २६२ विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, परीक्षा काळात परीक्षा केंद्रावर मोबाईल आणण्यास बंदी घालण्यात आली. दुसरीकडे कॉपीविरहित परीक्षा पार पाडण्यासाठी भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत.

उच्च माध्यमिक मंडळाच्या मुंबई विभागात बारावीच्या परीक्षेसाठी कर्जतमध्ये तीन कनिष्ठ महाविद्यालयात केंद्र उघडण्यात आली आहेत. कर्जत येथील अभिनव ज्ञान मंदिर प्रशालेत असलेल्या केंद्रावर कला, वाणिज्य, विज्ञान आणि बॅंकिंग अशा विभागांत ९४० विद्यार्थी परीक्षा देत आहेत. नेरळ विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात ८१५ विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी कशेळे येथील भाऊसाहेब राऊत माध्यमिक विद्यालयात प्रामुख्याने शासकीय आदिवासी आश्रमशाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणारे ५०७ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. असे एकूण २२६२ विद्यार्थी कर्जत तालुक्‍यातून बारावीची परीक्षा देत आहेत.

कर्जतमधील या तिन्ही परीक्षा केंद्रांवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सर्व ठिकाणी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका ठेवण्यात येत असलेल्या स्ट्राँगरूमला कडक पोलिसांचा पहारा आहे. रायगड पोलिसांकडून सीसी टीव्हींची नजरही २४ तास ठेवण्यात आली आहे, अशी माहिती रायगड पोलिस उपअधीक्षक अनिल घेरडीकर यांनी दिली आहे.

परीक्षा सुरू असताना कोणालाही मोबाईल वापरण्यास बंदी आहे. परीक्षा केंद्रामध्येही मोबाईलच्या प्रवेशास निर्बंध घालण्यात आले आहेत. कोणीही कॉपी करू नये, यासाठी उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने भरारी पथके नेमली आहेत.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News