काणकोणचा विक्रमी दर्पणला राज्याच्या कर्णधारपदाची जबाबदारी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 February 2020

राज्यस्तरीय स्पर्धेत दर्पण याने आतापर्यंत सात शतके नोंदविली असून पाच वेळा नाबाद राहिलेला आहे.

काणकोण : गोवा क्रिकेट असोसिएशनच्या १४ वर्षांखालील अध्यक्षीय करंडक क्रिकेट स्पर्धेत ५५४ धावांची विक्रमी खेळी केलेल्या दर्पण पागी सध्या आणखी एक महत्त्वाची जबाबदारी निभावत आहे. बंगळूर येथे सुरू असलेल्या दक्षिण विभागीय १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत खोला-काणकोणचा सुपूत्र राज्य संघाचे नेतृत्व करत आहे.

यंदाच्या मोसमात दर्पणने कात्यायनी बाणेश्वर विद्यालयाचे प्रतिनिधित्व करताना ८१ चौकार व १० षटकारांच्या मदतीने राज्य शालेय क्रिकेटमधील सर्वोच्च ५५४ धावांची खेळी केली. या कामगिरीने तो प्रकाशझोतात आला. त्याने सहकारी वंश बुक्कम याच्या साथीत ७७८ धावांची भागीदारी केली. भारतीय क्रिकेटमधील शालेय पातळीवरील मोजक्या विक्रमी कामगिरीत आता दर्पणही आला आहे.

क्रिकेटमधील वाटचालीत दर्पणला गोवा क्रीडा प्राधिकरणाचे प्रशिक्षक संदीप नाईक, गोवा क्रिकेट असोसिएशनचे प्रशिक्षक रॉबिन डिसोझा, राहुल केणी, कॉलिन रॉड्रिग्ज, राधाकृष्ण धुरी, काशिनाथ च्यारी, अनुराधा रेडकर, मडगाव क्रिकेट क्लबचे विनोद धामसकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. कात्यायनी बाणेश्व विद्यालयाचे मुख्याध्यापक उदय नाईक गावकर, शारीरिक शिक्षण शिक्षक संतोष सतरकर यांचेही दर्पणला बहुमूल्य प्रोत्साहन लाभल्याचे त्याचे वडील दिनेश पागी यांनी सांगितले. जीसीएचे प्रशिक्षण संचालक प्रकाश मयेकर, शरद पेडणेकर यांचेही दर्पणला मार्गदर्शन लाभल्याचे दिनेश यांनी सांगितले.

जीसीएचे सहकार्य दर्पणच्या क्रिकेट कारकिर्दीला गोवा क्रिकेट असोसिएशनच्या  उस्त्फूर्त सहकार्य लाभल्याचे त्याचे वडील दिनेश यांनी सांगितले. वयाच्या चौथ्या वर्षी प्लास्टिक बॅटने त्याच्या फलंदाजीस सुरवात झाली. त्याचे क्रिकेटमधील कौशल्य आणि आवड पाहून वडिलांनी मुलाला प्रोत्साहन दिले. वयाच्या १२व्या वर्षी त्याने जीसीए क्रिकेट संघाचे सर्वप्रथम प्रतिनिधित्व केले. २०१७ साली तो केरळमधील कोची येथे झालेल्या स्पर्धेत, तर २०१८ मध्ये आंध्र प्रदेशमधील स्पर्धेत खेळला. फलंदाजीतील उत्कृष्ट कामगिरीने त्याला यंदा १४ वर्षांखालील संघाचे कर्णधारपद मिळाले.

यंदाच्या मोसमातील १६ वर्षांखालील विजय मर्चंट करंडक क्रिकेट स्पर्धेतही त्याने गोव्याचे प्रतिनिधित्व केले. गोवा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सूरज लोटलीकर, उपाध्यक्ष शांबा नाईक देसाई, सचिव विपुल फडके, माजी अध्यक्ष चेतन देसाई, विनोद  फडके, माजी सचिव दया पागी यांनी दर्पणच्या गुणवत्तेवर विश्वास दाखवत पाठिंबा दिला, त्यामुळेच तो गोव्याचे राष्ट्रीय पातलीवरील स्पर्धेत प्रतिनिधित्व करू शकला, असे दिनेश यांनी स्पष्ट केले.

क्रिकेट सराव व अभ्यासात कसरत

राज्यस्तरीय स्पर्धेत दर्पण याने आतापर्यंत सात शतके नोंदविली असून पाच वेळा नाबाद राहिलेला आहे. पणसुले-काणकोण येथील श्री कात्यायनी बाणेश्वर विद्यालयात शिकणाऱ्या दर्पणला क्रिकेट प्रशिक्षणासाठी फातोर्डा-मडगाव येथे जावे लागले. त्यामुळे त्याला अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नाही, तरीही रविवारी व सुट्टीच्या दिवशी तो चुकलेला अभ्यास भरून काढत असला, तरी त्याला कसरत करावी लागले, असे वडील दिनेश यांनी नमूद केले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News