एअरलाईन्समधील प्रशिक्षणानंतर दिली मॉलमध्ये नोकरी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 March 2020

प्रशिक्षणावेळी साहित्य देण्यात आलेले नाही. प्रशिक्षणाचा दर्जा चांगला नव्हता, नातेवाईकांना भेटू दिले नाही, मुलाखती घेतलेल्या नाहीत, ज्यांच्या मुलाखती झाल्या, त्यांना एअरलाईनमध्ये नोकरी न देता मॉलमध्ये नियुक्‍त्या दिल्या. प्रशिक्षण साहित्य व पुस्तके प्रशिक्षणावेळी दिली नाहीत. मानसिक दबाव टाकला जात होता. प्रशिक्षणात थिअरी शिकवली, पण प्रात्यक्षिक दिले नाही.

रत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना
प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अनुभव अंगावर शहारे आणणारा होता, अशी मते उमेदवारांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने यांच्यापुढे मांडली.

अध्यक्ष बने यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीला उमेदवारांसह अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने, उमेदचे अधिकारी, कांचन नागवेकर, श्री. खाडे उपस्थित होते.जेएसएअंतर्गत एअरलाईन तिकिट रिझर्व्ह एजंट आणि एअरलाईन कार्गो असिस्टंट या पदावरील कामांच्या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील २१ उमेदवारांची निवड झाली. हे प्रशिक्षण १ जुलै ते २ ऑक्‍टोबर २०१९ या कालावधीत पूर्ण झाले. प्रशिक्षणावेळी साहित्य देण्यात आलेले नाही. प्रशिक्षणाचा दर्जा चांगला नव्हता, नातेवाईकांना भेटू दिले नाही, मुलाखती घेतलेल्या नाहीत, ज्यांच्या मुलाखती झाल्या, त्यांना एअरलाईनमध्ये नोकरी न देता मॉलमध्ये नियुक्‍त्या दिल्या. प्रशिक्षण साहित्य व पुस्तके प्रशिक्षणावेळी दिली नाहीत. मानसिक
दबाव टाकला जात होता. प्रशिक्षणात थिअरी शिकवली, पण प्रात्यक्षिक दिले नाही. यामध्ये शैक्षणिक नुकसान झाले असून नोकरी द्यावी आणि न्याय द्यावा, अशी मागणी उमेदवारांनी केली. प्रशिक्षण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्रही मिळाले नसल्याचे सांगितले.

उमेदवारांच्या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी जिल्हा व्यवस्थापकांनी जेएसएच्या व्यवस्थापकाशी दुरध्वनीवरुन संपर्क साधला. तेव्हा रत्नागिरीतील केंद्र नागपूरच्या केंद्रात मर्ज केल्याचे समजले. रत्नागिरीत कोणीही प्रतिनिधी नसून ते केंद्र बंद झाले आहे. याबाबत उमेदचे अधिकारी पूर्णतः अनभिज्ञ होते. तसेच कंपनीच्या प्रतिनिधींकडून रत्नागिरीची मुले मुलाखतीत कमी पडत असल्याचे सांगितले. ही उत्तरे प्रशिक्षण झाल्यानंतर दिली गेली. 

कंपनीला काळ्या यादीत टाकावे...

दरम्यान, प्रशिक्षणाचा दर्जा खराब व सुमार ठेवल्याने उमेदवारांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान झाले असून, संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकावे आणि दंडात्मक कारवाई करावी, असे पत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे पाठविल्याचे उमेदकडून सांगण्यात आले.

उमेदवारांना नोकऱ्या देण्यासाठी आणि कंपनीवर कारवाई व्हावी, यासाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू.
-रोहन बने, अध्यक्ष, जिल्हा परिषद

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News