भारतीय संघाचा बांगलादेशवर दणदणीत विजय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 February 2020

शेफालीच्या वेगवान ३९ धावांच्या सुरुवातीनंतर भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १४२ धावा केल्या. त्यानंतर बांगलादेशला ८ बाद १२४ धावांत रोखले.

पर्थ : शेफाली वर्माची तडाखेबंद फलंदाजी आणि त्यानंतर पुन्हा एकदा पूनमची जादूई फिरकी गोलंदाजी यामुळे भारतीयांनी महिला ट्‌वेंन्टी-२० विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशला १८ धावांनी हरवले. स्पर्धेतला सलग दुसरा विजय मिळवून उपांत्य फेरीच्या दिशेने ठाम पाऊल टाकले.

शेफालीच्या वेगवान ३९ धावांच्या सुरुवातीनंतर भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १४२ धावा केल्या. त्यानंतर बांगलादेशला ८ बाद १२४ धावांत रोखले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ विकेट मिळवणाऱ्या पूनमने आज १८ धावांत ३ बळी अशी कामगिरी केली. शिखा पांडे आणि अरुंधती रेड्डी यांनीही दोन विकेटचे योगदान दिले.

भारताची १४२ ही धावसंख्या या स्पर्धेतली आतापर्यंतची सर्वाधिक धावसंख्या होती. बांगलादेशकडून मुर्शिदा खातून आणि निगर सुलताना यांनी तिशीच्या पलीकडे मजल मारून प्रतिकार कायम ठेवला, पण भारतीय गोलंदाजांनी महत्त्वाच्या क्षणी विकेट मिळवत पकड कायम ठेवली. पूनम यादव गोलंदाजीस आल्यावर बांगलादेशच्या डावाला ब्रेक लागला.अखेरच्या १२ चेंडूत ३५ धावांची गरज असताना रुमाना अहमदने दोन चौकार मारून १० चेंडूत २५ असे समीकरण केले होते, पण पूनम आणि शिखा यांनी भारताचा विजय सुकर केला.

शेफालीचा तडाखा

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी मिळालेल्या भारताला शेफाली वर्माने ‘सेहवाग’ स्टाईल झंझावाती सुरुवात करून दिली. पर्थच्या सीमारेषा इतर मैदानापेक्षा लांबवर असल्या, तरी तिने षटकारांची भाषा सुरू केली. स्मृती मानधनाच्या अनुपस्थितीत सलामीला खेळणारी तानिया भाटिया अवघ्या दोन धावांवर परतली असली, तरी शेफालीवर त्याचा परिणाम झाला नाही. खणखणीत चार षटकार आणि दोन चौकारांसह तिने दोनशेपेक्षा जास्त स्ट्राईक रेटने ३९ धावा केल्या. अखेर एक उंच फटका मारण्याच्या प्रयत्नात ती बाद झाली.दुसऱ्या बाजूला जेमिमा रॉड्रिग्जही शानदार खेळी सजवत असताना कर्णधार हरमनप्रीत कौरने निराशा केली. तीसुद्धा एकेरी धावांत बाद झाली. १४ व्या षटकात जेमिमा धावचीत झाल्यावर भारतीच्या वेगाला ब्रेक लागला.

वेदाचे निर्णायक योगदान

यादरम्यान बांगलादेशी खेळाडूचे क्षेत्ररक्षण चपळ होते. धावा घेताना भारतीयांचा ताळमेळ चुकत होता, पण सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या वेदा कृष्णमूर्तीने ११ चेंडूत नाबाद २० धावांचा तडाखा दिला, त्यामुळे भारताला १४२ धावांपर्यंत मजल मारता आली

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News