पहिल्याच कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पराभव

सुनंदन लेले
Tuesday, 25 February 2020

‘‘हरण्यात लाज नसते, कारण खेळात हार-जीत होते. फक्त लढत देणे महत्त्वाचे असते. वेलिंग्टनच्या सामन्यात आम्ही लढत दिली नाही आणि सामना इतक्‍या सहजगत्या गमावला हे खटकणारे आहे. मला वाटते आम्ही फलंदाजांनी चांगली खेळी उभारली नाही. पहिल्या डावात आम्ही लवकर बाद झाल्याचा फायदा समोरच्या संघाने बरोबर घेतला.’’ 

वेलिंग्टन : नाणेफेकीबरोबर पहिल्या दिवसापासून अडखळणाऱ्या भारतीय संघावर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अखेर साडेतीन दिवसांतच दारुण पराभवाची नामुष्की आली. न्यूझीलंडने तब्बल १० विकेट राखून हा सामना जिंकला आणि दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. अफलातून स्विंग गोलंदाजी करून भारताच्या नऊ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवणारा टीम साऊदी सामन्याचा मानकरी ठरवला.

भारताचे उरलेले पाच भारतीय फलंदाज आज किती वेळ प्रतिकार करणार इतकेच औत्सुक्‍य सामन्यात उरले होते. अजिंक्‍य रहाणे आणि हनुमा विहारीला लगोलग बाद केल्यावर रिषभ पंतने २५ धावा केल्या इतकीच जमेची बाजू होती. त्या उलट ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदीने केलेला मारा लक्षणीय परिणाम साधून गेला. दुसऱ्या डावात टीम साऊदीने ५ आणि ट्रेंट बोल्टने ४ फलंदाजांना बाद करून संघाच्या विजयाचा रस्ता मोकळा केला. उपाहाराअगोदरच विजयाकरता गरजेच्या धावा न्यूझीलंडच्या सलामीच्या फलंदाजांनी काढून विजय हाती घेतला.

पराभव मान्य ः कोहली

भारतीय कर्णधार विराट कोहलीने पराभव मान्य केला. तो म्हणाला, ‘‘हरण्यात लाज नसते, कारण खेळात हार-जीत होते. फक्त लढत देणे महत्त्वाचे असते. वेलिंग्टनच्या सामन्यात आम्ही लढत दिली नाही आणि सामना इतक्‍या सहजगत्या गमावला हे खटकणारे आहे. मला वाटते आम्ही फलंदाजांनी चांगली खेळी उभारली नाही. पहिल्या डावात आम्ही लवकर बाद झाल्याचा फायदा समोरच्या संघाने बरोबर घेतला.’’ 

त्यांच्या गोलंदाजांनी आमचे हात बांधून ठेवले हे सत्य आहे, तरीही आम्ही जरा सकारात्मक विचारांनी मैदानात उतरून धावा काढण्याकरता योजना राबवायला पाहिजे होत्या. मी पृथ्वी शॉवर लगेच टीका करणार नाही. तो अजून नवखा आहे. आक्रमक फलंदाजी त्याची शैली आहे. तो खेळपट्टीवर असतो तेव्हा धावांचा ओघ असतो. मला वाटते त्याला पाठिंब्याची गरज आहे, असे कोहलीने सांगितले.

सकारात्मक फलंदाजी हवी

मोठ्या विजयाने न्यूझीलंड संघाचा आत्मविश्‍वास किती वाढलेला आहे याची आम्हाला कल्पना आहे. दुसऱ्या सामन्यात जोरकस पुनरागमन करायचे झाल्यास आम्हाला सकारात्मक फलंदाजीचा विचार करावा लागेल. द्विधा मन:स्थितीत राहून चालणार नाही. आहेत ते फटके मारून गोलंदाजांवर वर्चस्व मिळवावे लागेल, असे विराट म्हणाला.

संक्षिप्त धावफलक ः भारत पहिला डाव ः १६५ आणि दुसरा डाव ः १९१ (मयांक अगरवाल ५८, विराट कोहली १९, अजिंक्‍य रहाणे २९, हनुमा विहारी १५, रिषभ पंत २५, ईशांत शर्मा १२, टीम साऊदी २१-६-६१-५, ट्रेंट बोल्ट २२-८-३९-४).

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News