कठोर परिश्रमाने तरुणाईचे व्यक्तिमत्व खुलते

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 February 2020
  • ‘आयुष्याचा प्रवास हा खडतर, संघर्षमय असतो. त्याला सुखकर करण्याचे सामर्थ्य केवळ शिक्षणातच आहे.

पूर्णा : कठोर परिश्रम आणि विनय हाच तरुणाईचा अलंकार असायला हवा. याच दागिन्याने आपले व्यक्तिमत्व खुलते, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ प्रा. व्ही. डी. कोनाळे यांनी व्यक्त केले. येथील गोंधळसम्राट राजारामबापू कदम सांस्कृतिक सभागृहात येथील जिनियस अकादमीच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार व प्रेरणादायी व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी  करण्यात आले होते.

या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रयोगशील युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त अमृतराज कदम होते. कार्यक्रमाचे उद्‍घाटन प्रा. व्ही. डी. कोनाळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर व्याख्याते जगदीश जोगदंड, व्यंकटराव देसाई, श्री. गव्हाणे, संजय  कदम, अविनाश आहेरवाडकर, प्रदीप गव्हाणे, मारोती भुसारे, शेषेराव भुसारे, आनंता भुसारे, आयोजक प्रा. वैभव खाकरे, साईनाथ जोगदंड, विष्णू कदम आदी उपस्थित होते. प्रारंभी सरस्वती पूजन व  दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

या वेळी पुढे बोलताना प्रा. कोनाळे म्हणाले, ‘‘आयुष्याचा प्रवास हा खडतर, संघर्षमय असतो. त्याला सुखकर करण्याचे सामर्थ्य केवळ शिक्षणातच आहे. म्हणून ज्ञानाची लालसा ठेवत व गुणवत्ता राखत यश संपादित करा. या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात निकिता भालेराव, ऋतुजा वैद्य, मारोती पत्रे, ऋतुजा इंगोले, समृद्धी साळवे, करण शिंदे, साक्षी रवंदळे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक आयोजक वैभव खाकरे यांनी केले. सूत्रसंचालन ऋतुजा पंढरकर व मोक्षदा नवघरे यांनी केले. आरती कुऱ्हे हिने आभार मानले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News