मुक्तानंद महाविद्यालयात पदवी प्रदान समारंभ संपन्न

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 7 March 2020
  • आज देशातील स्थिती गंभीर बनली आहे. अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. या बाबींकडे विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन जनजागृती करण्याची गरज आहे

गंगापूर : ‘‘संकटाशिवाय जीवनात यश मिळणे कठीण आहे. आव्हाने स्वीकारणारी माणसेच इतिहास घडवितात. तुम्ही शरीराने पंगू झालात तरी चालेल; पण मनाने पंगू होऊ नका,’’ असे प्रतिपादन महात्मा गांधी मिशन विद्यापीठ, औरंगाबादचे कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांनी केले.

मुक्तानंद महाविद्यालयात शुक्रवारी  पदवी प्रदान समारंभ झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. मधुसूदन सरनाईक होते. याप्रसंगी मराठवाडा शिक्षणप्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष डॉ. अविनाश येळीकर, माजी आमदार ॲड. लक्ष्मणराव मनाळ, सहसचिव प्रभाकर पलोदकर, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य विश्वजित चव्हाण, वाल्मीक शिरसाठ, उपप्राचार्य प्रा. विशाल साबणे यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये कला, वाणिज्य, विज्ञान, बीसीए. बीसीएस; तसेच एमकॉम शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर पदव्यांचे मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. उपप्राचार्य डॉ. वैशाली बागूल यांनी प्रास्ताविक केले.

डॉ. गव्हाणे म्हणाले, ‘‘पदवी म्हणजे शिक्षणाचा पहिला टप्पा आहे. शिक्षणामुळे आयुष्यात क्रांती होते. तरुणांमधून चांगले समाजसेवक, उद्योगपती निर्माण व्हावेत. विद्यार्थ्यांनी स्वत:चे अस्तित्व स्वत: निर्माण करावे. ज्ञान व सत्ता यांचे एक समीकरण आहे. अभ्यासाने, व्यासंगाने बुद्धी तेजदार करा. आपल्या संभाषणाने, ज्ञानाने समोरील व्यक्तीला प्रेरित करा. आयुष्याला एक निश्‍चित ध्येय असले तरच विद्यार्थी काहीतरी वेगळे करू शकतो. विद्यार्थ्यांनी काळानुरूप आपल्या ज्ञानाचा वापर करावा. आज देशातील स्थिती गंभीर बनली आहे. अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. या बाबींकडे विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन जनजागृती करण्याची गरज आहे.’’ प्राचार्य डॉ. मधुसूदन सरनाईक यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. अजय देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब पवार यांनी आभार मानले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News