गोव्याच्या संध्याला बॅडमिंटन स्पर्धेत तिहेरी यश 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 2 March 2020

गोव्याची महिला बॅडमिंटनपटू संध्या मेलाशीमी हिने राष्ट्रीय पातळीवरील मास्टर बॅडमिंटन कोर्टवर दबदबा कायम राखला आहे.

पणजी: गोव्याची महिला बॅडमिंटनपटू संध्या मेलाशीमी हिने राष्ट्रीय पातळीवरील मास्टर बॅडमिंटन कोर्टवर दबदबा कायम राखला आहे. जयपूर येथील स्पर्धेत तिने तिहेरी किताब जिंकला. ४४व्या राष्ट्रीय मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत संध्याने महिला एकेरी, महिला दुहेरी व मिश्र दुहेरीत विजेतेपद पटकाविले. तिने या स्पर्धेत ३५+ वयोगटात भाग घेतला होता. 

संध्या महिला एकेरीत अव्वल मानांकित होती. अंतिम लढतीत तिने द्वितीय मानांकित शांतला कांपापुर्मठ हिला २१-७, २१-५ असे हरविले. मिश्र दुहेरीत वरुण शर्मा याच्या साथीत खेळताना संध्याने मनीष रावत व मानसी कोहली जोडीवर २१-१४, २१-१४ असा विजय मिळविला. महिला दुहेरीत संध्याने संगीता मारी हिच्यासमेवत अव्वल मानांकित युपू बोनी व शांतला कांपापुर्मठ जोडीस २१-१४ २१-१० जोडीस अंतिम लढतीत धक्का दिला.

गोव्याच्या अन्य खेळाडूंत ७०+ वयोगटात डॉ. सतीश कुडचडकर याने उपांत्यपूर्व फेरी गाठली. विल्फ्रेड जॅकिस (४५+), पराग चौहान व डार्विन बारेट्टो (४०+), कमलेश कांजी व यानिया टॉ (४०+) यांनीही चांगली कामगिरी केली. मूळ गोव्यातील सांगोल्डा येथील लेरॉय डिसा यांनी ६५+ वयोगटात पुरुष दुहेरीत विजेतेपद मिळविले. लेरॉय हे दुहेरीतील सात वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळविलेला माजी बॅडमिंटनपटू असून प्रकाश पदुकोण यांचे सहकारी होते.

गोमंतकीय बॅडमिंटनमध्ये विक्रम

राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत तीन गटात विजेतेपद मिळविणारी पहिली गोमंतकीय बॅडमिंटनपटू हा विक्रम आता संध्या मेलाशीमीच्या नावे नोंदीत झाला आहे. गतवर्षीच्या राष्ट्रीय मास्टर्स गटात संध्याने दोन गटात उपविजेतेपद मिळविले होते. यंदा तिने कामगिरीत सुधारणा करताना सुवर्णपदकास गवसणी घातली.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News