गंगावळण पर्यटन केंद्राच्या विकासासाठी तातडीने निधी देणार : आदित्य ठाकरे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 February 2020

अध्यक्ष महारुद्र पाटील, कार्याध्यक्ष अमोल भिसे यांच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे मंत्रालयात पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना गंगावळण पर्यटन केंद्र आराखडा दाखवला.

इंदापूर  : गंगावळण येथील पर्यटन केंद्र विकास आराखड्याचा अभ्यास करून या केंद्रास तातडीने निधी उपलब्ध करून दिला जाईल; अशी ग्वाही राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांनी दिली.

अध्यक्ष महारुद्र पाटील, कार्याध्यक्ष अमोल भिसे यांच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे मंत्रालयात पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना गंगावळण पर्यटन केंद्र आराखडा दाखवला. त्यानंतर ठाकरे यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले.यासंदर्भात महारुद्र पाटील म्हणाले, पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी भीमा नदी किनारी गंगावळण येथे ५ कोटी रुपयांच्या पर्यटन केंद्रास शासनाने मंजुरी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे तसेच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नाने या पर्यटन केंद्रास मंजुरी मिळाली असून, पहिल्या टप्प्यात १ कोटी ८२ लाख रुपयांच्या कामास शासकीय मंजुरी मिळाली होती. त्यानुसार गेस्ट हाउसचे काम प्रगतिपथावर असून संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले आहे.

उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी निधीची आवश्‍यकता असून, या निधीतून स्वीमिंग टॅंक, भीमा नदी पात्राजवळ घाट बांधणे, बाग व बागेत स्वयंचलित कारंजे तयार करणे, पर्यटकांसाठी स्वच्छतागृह बांधणे तसेच परिसरात हायमास्ट दिवे बसविणे, ही कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे या कामासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना आम्ही भेटलो असून, या कामासाठी निधीची पूर्तता होणार असल्याने तालुक्‍याचे पर्यटनवैभव वाढण्यास त्याची मदत होणार असल्याचे
त्यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News