हैदराबादमधील मराठी महाविद्यालय हद्दपार ?

उत्कर्षा पाटील
Thursday, 27 February 2020

महाराष्ट्राने देशातील प्रत्येक भाषेला मानाचे पान दिले; परंतु महाराष्ट्राच्या शेजारील राज्यातच मराठी पोरकी झाली आहे

मुंबई : महाराष्ट्राने देशातील प्रत्येक भाषेला मानाचे पान दिले; परंतु महाराष्ट्राच्या शेजारील राज्यातच मराठी पोरकी झाली आहे. तेलंगणा सरकारची सापत्न वागणूक आणि महाराष्ट्र सरकारच्या उदासीनतेमुळे हैदराबाद येथील एकमेव मराठी महाविद्यालय बंद होण्याची वेळ आली आहे.

कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा आणि तेलंगणा या राज्यांत मराठी भाषा जपण्यासाठी काही संस्था आटोकाट प्रयत्न करत आहेत. हैदराबाद येथील मराठी साहित्य परिषदेच्या तेलंगण राज्य विभागामार्फत मराठी महाविद्यालय चालवले जाते. या महाविद्यालयात मराठी विषयाचे शिक्षण दिले जाते.

बी.ए.पर्यंत विनामूल्य शिक्षण देणाऱ्या या महाविद्यालयातील १० अध्यापक मागील १० वर्षांत निवृत्त झाले. या वर्षी चतुर्थ श्रेणीतील एका कर्मचाऱ्यासह काही शिक्षकांची बदली सरकारी महाविद्यालयात करण्यात आली. त्यामुळे आता एकच शिक्षक राहिला असून, विद्यार्थ्यांची संख्याही ३५ ते ४० वर आली आहे. याबाबत विनंती करूनही तेलंगणा सरकारने कोणतीही मदत केली नाही, अशी व्यथा साहित्य परिषदेच्या अध्यक्ष विद्या देवधर यांनी व्यक्त केली.

सरकारने मदत केली नाही, तर पुढील दोन वर्षांत महाविद्यालय बंद करण्याची वेळ येईल. ही परिस्थिती आम्ही महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचवली; पण सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे या वर्षी अकरावी आणि बी.ए. प्रथम वर्षाचे प्रवेश बंद करावे लागले, असे विद्या देवधर म्हणाल्या. महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवून दरवर्षी पाच लाख रुपये अनुदान देण्याची विनंती केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News