परीक्षेचा कालावधी म्हणजे रणागणांतील प्रत्यक्ष युध्दच

प्रा. राहुल शिंदे
Wednesday, 4 March 2020

सध्याच्या सामाजिक परिस्थितीत खोलवर डोकावून पाहिले तर पाल्यांचे मार्क म्हणजे पालकांची प्रतिष्ठाच होय. त्यातल्या त्यात दहावी-बारावीचे मार्क म्हणजे पालकांना स्वतःचे स्टेटसच वाटते. पूर्वी दहावी किंवा बारावीची परीक्षा ही मुलांची होती; परंतु सध्याच्या परीक्षांचा ट्रेंड पाहिला असता ती पालकांची परीक्षा म्हणायला हरकत नाही. त्यात आपला पाल्य जर दहावी किंवा बारावी नापास झाला तर विचारूच नका. 

दहावीची परीक्षा म्हणजे एक लढाईच असते जणू. दहावी, बारावीच्या वर्षात त्या विद्यार्थ्याला प्रत्येक दिवशी पालकांकडून नातेवाइकांकडून मित्रांकडून २४ तास त्या परीक्षांची आठवण करून दिली जाते. त्यात परीक्षेचा कालावधी म्हणजे जणू रणांगणातील प्रत्यक्ष युद्धच. या मनःस्थितीतून पालकांनी बाहेर पडायला हवे. 

आपल्या पाल्यावर विश्‍वास ठेवायला हवा. आपली मुले अभ्यासात कशी आहेत हे आपल्याला माहीतच असते. मार्क किती मिळतील, यापेक्षा मुलांना किती संकल्पना समजतात. यावर लक्ष देणे गरजेचे आहे. माझ्या मते आताच्या मुलांना अभ्यासाविषयी काळजी आहे. त्यांना स्वतःच्या परिस्थितीविषयी नक्कीच जाणीव असते. अगदी त्याला ती काळजी व जाणीव नसेल तर मुलांना जवळ घेऊन काय चूक, काय बरोबर हे समजावून सांगणे पालकांचे कर्तव्यच आहे. पाल्यांचेही विचार ऐकून घेणे गरजेचे आहे. उगाच तू जास्त मार्क्‍स मिळवायला हवेत, असा अट्टाहास करणे योग्य नाही. 

दहावी-बारावीची परीक्षा ही आयुष्यातील पहिल्या टप्प्यावरील परीक्षा असते... अंतिम नव्हे. काही मूल अभ्यासात अध्ययन अक्षम असतात. त्यामागची कारणे पालकांनी शोधणे गरजेचे असते. पाल्यांना मिळणाऱ्या गुणांचा पालकांनी मोठ्या मनाने स्वीकार करायला हवा. अशा प्रसंगी पालकांची भूमिका समुपदेशकाची असावी. सर्कशीतील रिंग मास्टर्सची नव्हे.

शिक्षकांनी दिलेले ज्ञानाचे धडे, पालकांनी दिलेले संस्कार विद्यार्थ्याला खऱ्या अर्थाने यशाच्या शिखरावर नेऊन ठेवतात. बागेतील रोपट्याप्रमाणे मुले असतात. शिक्षक व पालक बागेतील माळ्याची भूमिका बजावत असतात. आधुनिकतेच्या वाटेवर पालकांची भूमिका एक जागरूक नागरिकाची आहे. दहावी-बारावीच्या परीक्षेनंतर ते निकालापर्यंत पालकांच्या मनात अनेक प्रश्‍न उपस्थित होतात. कोणत्या शाखेत-क्षेत्रात मुलांचे उज्ज्वल भविष्य होईल. आर्टसला ॲडमिशन घेऊ की कॉमर्सला वगैरे वगैरे अशा परिस्थितीत पालकाने संयमाने निर्णय घेणे आवश्‍यक तर असतेच परंतु पाल्याच्या विचारालादेखील योग्य सन्मान द्यायला हवा.

आपल्या मुलाचे दहावी-बारावीनंतरचे करिअर जाणून घेण्यासाठी पालकांनी व पाल्यांनी रोज वर्तमानपत्रे बारकाईने वाचणे गरजेचे आहे. त्यामध्ये येणाऱ्या करिअरच्या संधी दहा-बारावीनंतरची चर्चासत्रे, व्याख्याने यांचा लाभ घ्यायला हवा. यामुळे आपल्या मुलाच्या भविष्यासाठी त्याला आवडणाऱ्या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या भेटी घेणे सहज शक्‍य होईल. सुटीच्या कालावधीत शहरात आयोजित केल्या जाणाऱ्या करिअरविषयक शिबिरात-चर्चासत्रांमध्ये आवर्जून सहभाग नोंदवायला हवा. शासकीय-व्यावसायिक कार्यालयांना पाल्यासमवेत भेटी देऊन आपल्या मनातील शंका किंवा प्रश्‍न विचारायला हवेत.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News