भाषिक विकासासाठी असरअल्ली शाळेचा 'हा' अनोखा उपक्रम

अशोक कुम्मरी
Monday, 2 March 2020

शाळेतील ‘मी रिपोर्टर’ या अभिनव उपक्रमातून विद्यार्थ्यांचा भाषिक विकास व व्यक्तिमत्त्व विकास वृद्धींगत करण्याचे कार्य या शाळेतून होत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास वाढून मराठी भाषेत प्रावीण्य मिळण्यासह या भाषेवर त्यांचे प्रेम वाढत आहे.

सिरोंचा : आपल्या विविध उपक्रमांसाठी व विद्यार्थी पटसंख्या वाढवत जिल्हाभरात लोकप्रिय असलेल्या तालुक्‍यातील असरअल्ली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा भाषिक व व्यक्तिमत्त्वविषयक विकास घडवून आण्यासाठी ‘मी रिपोर्टर’ हा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास वाढून मराठी भाषेत प्रावीण्य मिळण्यासह या भाषेवर त्यांचे प्रेम वाढत आहे.

असरअल्ली येथील या शाळेने शिक्षणासोबत अभिनव पद्धतीने संशोधित केलेल्या नवनवीन उपक्रमांमुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत भर पडून त्यांचा विकास होत आहे. सिरोंचा तालुक्‍यात पूर्वी तेलुगू माध्यम असल्याने आणि पूर्वीपासून तेलुगू संस्कृतीचा प्रभाव असल्याने विद्यार्थ्यांना मराठी बोलण्यात अडचण निर्माण होत होती. परंतु या शाळेतील ‘मी रिपोर्टर’ या अभिनव उपक्रमातून विद्यार्थ्यांचा भाषिक विकास व व्यक्तिमत्त्व विकास वृद्धींगत करण्याचे कार्य या शाळेतून होत आहे.

विद्यार्थ्यांच्या सुदृढतेकडे विशेष लक्ष देऊन सुदृढ बालक देशाची शान म्हणून या शाळेत नियमित सकाळी ५.३० ते ७.३०पर्यंत योग व कराटे वर्ग शाळेच्या माध्यमातून घेण्यात येतात. विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास साधण्याचा प्रयत्न या शाळेच्या माध्यमातून होत आहे. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा असरअल्लीच्या वतीने दरवर्षी शाळेसाठी पुस्तक प्रकाशन, विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना देण्यासाठी त्यांच्या कल्पनांना बळ देत या पुस्तकातून त्यांचे विचार प्रकाशित करण्यात येतात. शाळेत हे सर्व उपक्रम राबविण्यासाठी शाळेतील शिक्षकवृंद परिश्रम घेत असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक खुर्शीद शेख यांनी सांगितले.

इंग्रजींचे धडे

या शाळेत एका वेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून इंग्रजी भाषेचे धडे मनोरंजक पद्धतीने दिले जातात. ‘अंडरस्टॅंडींग इंग्लिश’च्या आगळ्या- वेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून इंग्रजी भाषा विकासावर विशेष कार्य या शाळेच्या माध्यमातून होत असल्याने शाळेतील विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करायला तयार होत आहेत.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News