डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशनतर्फे उमेदवारांना न्याय देण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 February 2020

२३ जून २०१७ च्या शासन निर्णयानुसार उमेदवारांच्या पात्रतेनुसार निवड सूची यादी लावण्यात येईल असे सांगण्यात आले होते.

औरंगाबाद : समांतर आरक्षणातून डावललेल्या उमेदवार, माजी सैनिकाच्या रिक्त जागा, तसेच गैरहजर, अपात्र जागांची यादी तत्काळ लावून उमेदवारांना न्याय द्यावा, अशी मागणी डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे. याबाबत शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना निवेदन देण्यात आले. 

निवेदनात म्हटले, की पवित्र प्रणालीअंतर्गत निवड झालेल्या यादीमध्ये मोठ्या प्रमाणात समांतर आरक्षण डावलले आहे. २३ जून २०१७ च्या शासन निर्णयानुसार उमेदवारांच्या पात्रतेनुसार निवड सूची यादी लावण्यात येईल असे सांगण्यात आले होते. त्यानुसार दोन याद्या जाहीर करण्यात आल्या. त्या निवड याद्यांमध्ये महिला आरक्षण डावलले. त्याबदल्यात प्रकल्पग्रस्त असलेल्या गुणवत्ता धारण करणाऱ्या उमेदवारांची निवड त्या प्रवर्गात खुली म्हणून न करता प्रकल्पग्रस्त आरक्षण देऊन अन्याय करण्यात आला.

भूकंपग्रस्तांच्या जागेवर उमेदवार न मिळाल्यास तेथे प्रकल्पग्रस्तांना जागा द्यावी, परंतु त्याठिकाणी प्रकल्पग्रस्त उमेदवार न भरता सर्वसाधारण उमेदवारांना जागा देण्यात आल्या. त्यामुळे समांतर आरक्षणाचे उल्लंघन असून, अशा पद्धतीने जवळपास पाचशेपेक्षा जास्त जागा डावलण्यात आल्या. त्यामुळे अन्यायग्रस्त उमेदवारांना समांतर आरक्षण व बाधित सर्व उमेदवारांना न्याय देण्यात यावा. नियुक्त झालेले मात्र, कागदपत्र पडताळणी वेळी गैरहजर किंवा अपात्र ठरविण्यात आले त्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात यावी. 

पवित्र प्रणालीअंतर्गत नऊ ऑगस्ट रोजी माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गावर निवड झालेल्या सर्व उमेदवारांना सात फेब्रुवारी २०२० च्या नवीन यादीत डावलण्यात आले. त्यामुळे कमी गुण असणाऱ्या बऱ्याच उमेदवारांना पहिली ते आठवी इयत्तेवर निवड देऊन डावलण्यात आलेल्या उमेदवारांना समांतर आरक्षणाचा फायदा झाला नाही. त्यामुळे खासगी शिक्षण संस्थेचे एक ते बाराचे संपूर्ण रोस्टर हे एकाच वेळी व एकाच नियमानुसार राबवावे.

निवड यादीतून डावलून अन्याय केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना समावून घेऊन न्याय द्यावा; तसेच अनेक उमेदवार गुणवत्ता धारण करून किंवा आरक्षण संवर्गामध्ये निवड होणे अपेक्षित असताना त्यांची निवड झाली नाही. या सर्व बाबींचा विचार करून अन्यायग्रस्त उमेदवारांची निवड करण्यात यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News