तरुणाईला क्रेझ ‘व्हॅलेंटाइन डे’ची

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 February 2020
  • प्रेमदिवस म्हणजेच ‘व्हॅलेंटाइन डे’ची क्रेझ दरवर्षी वाढत आहे. हा दिवस म्हणजे भारतीय संस्कृतीतला नाही, असे म्हणत अनेकांनी तो साजरा करू नये, असा संदेश दिला असला, तरी आजच्या युवापिढीमध्ये ‘व्हॅलेंटाइन डे’ ही एक क्रेझ बनली आहे

नंदुरबार : प्रेमदिवस म्हणजेच ‘व्हॅलेंटाइन डे’ची क्रेझ दरवर्षी वाढत आहे. हा दिवस म्हणजे भारतीय संस्कृतीतला नाही, असे म्हणत अनेकांनी तो साजरा करू नये, असा संदेश दिला असला, तरी आजच्या युवापिढीमध्ये ‘व्हॅलेंटाइन डे’ ही एक क्रेझ बनली आहे. तो मात्र मैत्रीपर्यंतच सीमित राहावा, अशा संमिश्र प्रतिक्रिया आजच्या तरुणाईने व्यक्त केल्या आहेत. 

 

खऱ्या प्रेमाला कुठल्याच ‘डे’ची गरज नसते. कारण, त्यांच्या आठवणीतील प्रत्येक दिवस हा ‘व्हॅलेंटाइन डे’ असतो आणि ते अशा ‘डे’वर विश्वास ठेवत नाही.
-चेतन सावंत (जी. टी. पाटील महाविद्यालय, नंदुरबार)

 

‘व्हॅलेंटाइन डे’ हा नक्कीच साजरा करायला हवा. पण, तो साजरा करताना भारतीय संस्कृती जपत कुठल्याच प्रकारची विकृती न करता साजरा करायला हवा. प्रेयसी आणि प्रियकर या दोघांतील काही दुरावे असतील, तर ते या दिवशी दूर होत त्यांच्यात नव्याने प्रेमाचे संबंध निर्माण होऊ शकतात. हा दिवस साजरा करायलाच हवा. कारण, प्रेम ही अशी भावना आहे, की ज्याच्याने आपल्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
-जागृत टवाळे (टीवायबीएसी, वरिष्ठ महाविद्यालय, तळोदा)

 आपल्या मराठी संस्कृतीत ‘व्हॅलेंटाइन डे’चा उल्लेख कुठेच नाही. आता नवीन ट्रेंडनुसार ‘व्हॅलेंटाइन डे’ म्हणजे प्रेमाचा दिवस समजला जातो. भारताची युवापिढी आंधळी होत चाललीय. मला मान्य आहे १४ फेब्रुवारीला तुम्ही प्रेम व्यक्त करतात. पण, ज्यांना गरज आहे, त्यांच्याशी कधी दोन शब्द तरी बोललोय का? हा विचार कोणी करत नाही. ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करायचाय तर त्या रस्त्यावरील गरीब मुलांना काही क्षण देऊन साजरा करा.
-विनोद महाजन (श्री हिरालाल मगणलाल चौधरी शिक्षण  संस्था, नंदुरबार)

 

‘व्हॅलेंटाइन डे’ हा पाश्चिमात्य सण असला, तरी सध्याच्या युगात भारतातसुद्धा मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. हा सण प्रेमाचे प्रतीक असून, या सणाच्या माध्यमातून आपण आपले आई- वडील, भाऊ- बहीण किंवा आपल्या कुटुंबातील वरिष्ठ व्यक्ती तसेच आपल्या शिक्षकांबद्दल असलेले आपले प्रेमदेखील व्यक्त करू शकतो. त्यामुळे हा दिवस साजरा करण्यात काही हरकत नाही. फक्त आपल्या संस्कृतीचा आदर ठेवून साजरा करायला हवा.
-फाल्गुनी सूर्यवंशी (एफवायबीएसी, वरिष्ठ महाविद्यालय, तळोदा)

 

‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करू नये असे मला मुळीच वाटत नाही. ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करत असताना आपण कम्युनिटीतील लोकांना सोबत घेऊन किंवा परिवारामध्येसुद्धा साजरा करू शकतो. मात्र, ‘व्हॅलेंटाइन डे’मध्ये पावित्र्य राखता आले तर खूप चांगले होईल. ‘व्हॅलेंटाइन डे’ आणि रक्षाबंधन यांचा तुलनात्मक अभ्यास करताना असे लक्षात येते, की रक्षाबंधन हा सण पावित्र्याच्या भावनेतून साजरा केला जातो, तर ‘व्हॅलेंटाइन डे’ हा खुली विचारधारा व्यक्त करत असल्यामुळे स्वातंत्र्यापेक्षा स्वैराचार जास्त वाढलेला दिसून येतो. -भाग्यश्री माणक पाटील (तृतीय वर्ष बीए, महिला महाविद्यालय, शहादा)

‘व्हॅलेंटाइन डे’ हा सहजासहजी महाविद्यालयांमध्ये साजरा केला जातो. हा दिवस कितपत योग्य किंवा अयोग्य आहे, हे साजरा करणाऱ्या मुलांवर अवलंबून असते; परंतु माझ्या मते हा दिवस ‘ब्लॅक डे’ म्हणून साजरा करावा. कारण, त्या दिवशी भारतीय सैनिक पुलवामा हल्ल्यात शहीद झाले होते, म्हणून ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा न करता त्या दिवशी भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली पाहिजे.
-दादा रावल (आयएमआरडी महाविद्यालय, शहादा)

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News