व्हाॅट्सअॅप चॅट वरून खडाजंगी ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 February 2020

ठाणे शहराच्या उष्म्यात गेल्या काही दिवसात वाढ झाली असताना, शहराचा कारभार जिथून हाकला जातो अशा ठाणे महापालिकेचे वातावरणही गेल्या काही दिवसांपासून ‘गरम’ झाले आहे.

ठाणे : ठाणे शहराच्या उष्म्यात गेल्या काही दिवसात वाढ झाली असताना, शहराचा कारभार जिथून हाकला जातो अशा ठाणे महापालिकेचे वातावरणही गेल्या काही दिवसांपासून ‘गरम’ झाले आहे. महापालिकेतील खांदेपालटावरून स्थानिक आणि प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांमध्ये आधीच शीतयुद्ध पेटले आहे. हा विषय थंड होतो तोच महापालिका अधिकाऱ्यांच्या ‘व्हॉट्‌सअॅप’ चॅटवरून पालिकेतील वातावरणात आणखीनच भडका उडाला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्याने इतर अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांबाबत विशेषतः महिलांवरून आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे आजच्या महासभेत त्याचे चांगलेच पडसाद उमटले. महापालिका अधिकाऱ्यांच्या ‘व्हॉट्‌सअप ग्रुप’वर काही आक्षेपार्ह मजकूर टाकून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील महिला सदस्यांबाबत आक्षेपार्ह टीका टिप्पणी केल्याचा प्रकार आजच्या सर्वसाधारण सभेत चर्चेला आला होता. शिवसेनेचे नगरसेवक संजय भोईर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे, नंदा पाटील, नगरसेवक कृष्णा पाटील यांनी असा प्रकार घडला असेल तर तो चुकीचा असल्याचे सांगितले.

यावेळी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांनी या प्रकरणाबाबत विचारणा केली. त्यावर महापालिका सचिव अशोक बुरपुल्ले यांनी हा प्रकार घडल्याची माहिती सभागृहाला दिली. मात्र संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव उघड केले नाही.  सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी अशा प्रकारे आक्षेपार्ह मजकूर टाकणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले. 

यावेळी माजी महापौर मीनाक्षी शिंदे याही आक्रमक झाल्या. त्यांनी अशा प्रकारे आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई होणे आवश्‍यक असल्याची भूमिका मांडली. या अधिकाऱ्यांच्या विरोधात सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक झालेले असताना ज्या अधिकाऱ्यांच्या ग्रुपवर हा मेसेज टाकण्यात आला, त्या ग्रुपवरील अधिकाऱ्यांनी बांगड्या घातल्या आहेत का? अशी विचारणाही त्यांनी केली. त्यानंतर  महापौर नरेश म्हस्के यांनी अर्ध्या तासासाठी महासभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News