जिल्हा क्रिकेट संघटनेच्या अर्जाला आयुक्तांची स्थगिती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 February 2020

सहधर्मादाय आयुक्तांच्या २७ नोव्हेंबर २०१९ च्या निर्णयाला आजीव सभासद अॅड. अतुल कराड आणि जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव सचिन मुळे यांनी खंडपीठात आव्हान दिले होते.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचा फेरफार अर्ज सहधर्मादाय आयुक्त सुरेंद्र कुमार बियाणी यांनी फेटाळला होता. तसेच २००८ मध्ये ४८ सभासदांतर्फे करण्यात आलेले अपीलही त्यांनी फेटाळले होते. नवीन ४८  सभासदांसह मूळ अर्जदार सचिन मुळे, वसंत शर्मा, मोहन बोरा यांचे सभासदत्व अवैध ठरवण्यात आले होते. या निर्णयाला औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी अंतरिम स्थगिती दिली आहे.

सहधर्मादाय आयुक्तांच्या २७ नोव्हेंबर २०१९ च्या निर्णयाला आजीव सभासद अॅड. अतुल कराड आणि जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव सचिन मुळे यांनी खंडपीठात आव्हान दिले होते. याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती देव यांच्यासमोर झाली. मोहन बोरा व वसंत शर्मा यांच्या प्रलंबित याचिकेत अंतरिम स्थगिती असतानाही सहधर्मादाय आयुक्तांनी अपिलावर अंतिम निर्णय घेतला.

सहधर्मादाय आयुक्तांसमोर दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात स्थगिती असल्याने बाजू मांडण्यात आली नाही, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. नितीन गवारे व अॅड. अमेय सबनीस यांनी केला. चार एप्रिल २०१८ रोजी नवीन सभासद आणि मूळ अर्जदार सचिन मुळे यांनी केलेल्या अपिलावर तीन महिन्यांत निर्णय घ्यावा व त्याचबरोबर नवीन ४८ सभासदांबाबत सहधर्मादाय आयुक्तांनी निर्णय घेण्याचे आदेश तत्कालीन न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांनी दिले होते. 

यानुसार सहधर्मादाय आयुक्तांसमोर सुनावणी झाली. आक्षेपकर्ते मोहन बोरा व वसंत शर्मा यांनी सहधर्मादाय आयुक्तांसमोर अपील चालवू नये अशी विनंती करणारा अर्ज दिला. धर्मादाय आयुक्तांनी त्यांचा अर्ज फेटाळला. या निर्णयाला बोरा व शर्मा यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. २० जुलै २०१८ रोजी खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे. ही याचिका आजही प्रलंबित आहे. या प्रकरणात एकूण ५१ सभासदांचे सदस्यत्व रद्द झाले आहे.

या निर्णयाला आव्हान दिले असता खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे. या याचिकेतील प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश न्यायमूर्ती देव यांनी दिले. सहधर्मादाय आयुक्तांतर्फे ए. एस. शिंदे यांनी नोटीस स्वीकारली. या याचिकेत अतुल कराड यांची बाजू नितीन गवारे, अमेय सबनीस यांनी, तर सचिन मुळे यांची बाजू पी. के. जोशी यांनी मांडली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News