'या' महाविद्यालयाला मिळाली मानसोपचार पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवण्याची परवानगी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 February 2020

बदलती जीवनशैली, ताणतणावासह इतर कारणांमुळे मोठ्या प्रमाणात मानसिक आजाराचे रुग्ण वाढत आहेत. मात्र, त्या तुलनेत मानसोपचारतज्ज्ञांची संख्या कमी आहे.

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मानसोपचार विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्स’ची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे हा अभ्यासक्रम लवकरच सुरू होईल. विशेष असे की, मानसोपचार विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रम असलेले मेडिकल विदर्भातील पहिले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय असेल. यापूर्वी मेयोने प्रयत्न केले होते; परंतु तेथील सुविधांचा अभाव लक्षात घेता मेयोला मान्यता मिळाली नाही.

बदलती जीवनशैली, ताणतणावासह इतर कारणांमुळे मोठ्या प्रमाणात मानसिक आजाराचे रुग्ण वाढत आहेत. मात्र, त्या तुलनेत मानसोपचारतज्ज्ञांची संख्या कमी आहे. त्यानंतरही वैद्यकीय शिक्षण खात्याच्या राज्यातील १७ पैकी केवळ दोनच शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांत मानसोपचार विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम आहेत. यात मराठवाडा, विदर्भातील एकही महाविद्यालय नाही.

मेडिकलने पुढाकार घेत मानसोपचार विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न चालवले होते. त्यासाठी तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी आवश्‍यक शिक्षकांसह स्वतंत्र वॉर्डाची व्यवस्था केली होती. विद्यमान अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी या प्रस्तावाचा पाठपुरावा केला. त्यामुळे गेल्या वर्षी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिककडून तर नुकतीच मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडून या अभ्यासक्रमाला मंजुरी मिळाली आहे.

त्यामुळे आता या पदव्युत्तर अभ्यासक्रमात चार विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. निश्‍चितच त्यामुळे या विषयात तज्ज्ञ डॉक्‍टरांची संख्या वाढण्यास मदत मिळणार आहे. विदर्भात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे मानसोपचार विषयातील पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना या भागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या विषयातही लक्ष घालता येणार आहे. या अभ्यासक्रमाच्या यशस्वितेत विभागप्रमुख डॉ. प्रशांत टिपले, सहयोगी प्राध्यापक डॉ. मनीष ठाकरे यांनी परिश्रम घेतले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News