दिव्यांग शब्दाची व्याख्या बदलत 'तो' झाला यशस्वी गिर्यारोहक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 28 January 2020

एका पाय व हाताने दिव्यांग असून, आतापर्यंत कळसूबाई शिखर, लिंगाना सुळका, कळकराई सुळका आणि खडतर असा वजीर सुळका सर केला असून, महाराष्ट्रातील विविध गड-किल्ल्यांवर यशस्वीरित्या गिर्यारोहण केले आहे.

अकोट : महाराष्ट्रातील जुन्नर तालुक्यातील नानेघाटात वसलेला अतिशय अवघड, जमिनीपासून सुमारे ४५० मीटर उंच असलेला वानरलिंगी सुळका अकोला जिल्ह्यातील अकोट येथील गिर्यारोहक धीरज कळसाईत यांनी अवघ्या दोन तास १५ मिनिटांत रविवारी प्रजासत्ताक दिनी सर केला. याठिकाणी तिरंगा फडकविला, राष्ट्रगीत व सलामी दिली. सर्वोच्च उंच हिमशिखर माऊंट एव्हरेस्ट मोहिमेवर जाण्याचा संकल्प धीरजने व्यक्त केला आहे.

वानरलिंगी सुळका भल्या-भल्या गिर्यारोहकांना आवाहन देणारा कडा आहे. जमिनीपासून सुमारे ४५० मीटर उंच असलेला हा सुळका सरळ ९० अंश कोनात ताठ मानेने उभा आहे. या सुळक्याची गणना गिर्यारोहण क्षेत्रात अतिकठीण श्रेणीत केली जाते. त्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठीसुद्धा वांद्रे गावातून तब्बल तीन तासांची दमछाक करावी लागते. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने सुळक्यावर तिरंगा फडकावण्याचा मानस राखून धीरज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास पुण्याहून जुन्नरला निघाले. सकाळी सुमारे सहा वाजता वानरलिंगी सुळका प्रस्तरोहन चालू केले. अनेक मोहिमांचा अनुभव असलेल्या धीरजने अवघ्या दोन तास १५ मिनिटांत हा सुळका सर केला. या मोहिमेत धीरज सोबत बाल गिर्यारोहक साई कवडे, महाराष्ट्र पोलिस दलातील तुषार पवार यांनी पॉईंट ब्रेक ॲडव्हेंन्चर होते.

एका पाय व हाताने दिव्यांग असून, आतापर्यंत कळसूबाई शिखर, लिंगाना सुळका, कळकराई सुळका आणि खडतर असा वजीर सुळका सर केला असून, महाराष्ट्रातील विविध गड-किल्ल्यांवर यशस्वीरित्या गिर्यारोहण केले आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर दक्षिण ऑफ्रीकेतील माऊंट किली मंजारो (उंची पाच हजार ८९५ मीटर) हे हिमशिखर रोजी आणि रशियातील माऊंट एलब्रुस (उंची पाच हजार ६४२ मीटर) हे हिमशिखर रोजी यशस्वीरित्या सर केले आहेत. त्यांची दखल घेत  इंडिया व महाराष्ट्र बुकात त्यांची नोंद झाली आहे. धीरजची घरची परिस्थिती हलाखीची आहे. पंरतु, गिर्यारोहण सारखे अवघड क्षेत्र जिद्द आणि चिकाटी सोबत घेऊन या तरुणाने दिव्यांग शब्दाची व्याख्या अशी बदलून टाकली की, धडधाकट माणसालाही लाजवेल असे धाडस करीत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News